"एडिस'च्या भारतीय प्रजातीपासून झिकाचा प्रसार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

पुणे - "एडिस एजिप्ती' या डासाच्या भारतीय प्रजातीपासून जीवघेण्या झिका विषाणूचा प्रसार होऊ शकतो, त्यामुळे या आजाराच्या प्रसारावर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे' (एनआयव्ही) तील संशोधकांनी म्हटले आहे. भारतासह जगभरातील विविध देशांमध्ये या विषाणूचे अस्तित्व आढळून आले असून, ब्राझीलला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. या संशोधनामध्ये प्रामुख्याने "एडिस एजिप्ती' या डासाची भारतीय प्रजाती झिका विषाणूला कशा पद्धतीने प्रतिसाद देते, हे अभ्यासण्यात आले होते. या डासांना मुखाद्वारे विषाणूचा संसर्ग होऊ शकतो का? आणि या डासांनी माणसाला दंश केल्यानंतर तो विषाणू मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो का? या बाबींचाही या प्रयोगामध्ये अभ्यास करण्यात आला होता, असे पुण्यातील "एनआयव्ही'चे संचालक देवेंद्र मौर्य यांनी सांगितले. "इंटरव्हायरोलॉजी' या नियतकालिकामध्ये हे संशोधन विस्ताराने प्रसिद्ध करण्यात आले आहे. मायक्रोबायल कंटेन्मेंट कॉम्प्लेक्‍स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे, नॅशनल जालमा इन्स्टिट्यूट ऑफ लेप्रोसी अँड अदर मायक्रोबॅक्‍टेरिअल डिसीज, आग्रा आणि साताऱ्यातील "क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्सेस' या संस्थांमधील संशोधकांनी मिळून यासंबंधीचा शोधनिबंध लिहिला आहे.

स्थानिक प्रजातीपासून प्रसार
आतापर्यंत देशभरात झिका विषाणूच्या चार घटना उघड झाल्या असून, या रुग्णांना झिकाची लागण डासांच्या स्थानिक प्रजातींच्या माध्यमातूनच झाली आहे. यामुळे आपल्या देशात डासांच्या स्थानिक प्रजातीच्या माध्यमातून फार कमी वेगाने या विषाणूचा प्रसार होत असल्याचे आढळून आले आहे. या तुलनेत आफ्रिकी प्रजातीच्या डासांद्वारे या विषाणूचा अधिक वेगाने प्रसार होत असल्याचे मौर्य यांनी सांगितले.

मेंदूला धोका
आफ्रिका खंडाच्या बाहेर विविध भागांमध्ये या विषाणूच्या प्रसाराचा पॅटर्न हा सर्वांचीच चिंता वाढविणारा असून, या विषाणूची लागण झालेल्या मुलांच्या मेंदूच्या वाढीवरदेखील याचा परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. ज्या ठिकाणी या रोगाचा सर्वाधिक वेगाने प्रसार होऊ शकतो, अशा ठिकाणी आपल्याला अधिक वेगाने आणि प्रभावीपणे काम करावे लागेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. या संशोधनावर भाष्य करताना गोवा येथील "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च'मधील संशोधक अश्‍वनी कुमार म्हणाले, की डासांद्वारे झिका विषाणू जेव्हा मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो त्यानंतर तो विविध अवयवांमध्ये ठाण मांडून बसतो. पण, याचा सर्वाधिक धोका हा मेंदूला असतो.

झिका विषाणूचा प्रसार हा जगाची चिंता वाढविणारा असून, यापासूनच मोठा धोका आहे.
- प्रज्ञा यादव, संशोधक

Web Title: mosquito edis egypt zika infection