Pune News : म्हाळुंगेत सांडपाण्यामुळे वाढला डासांचा प्रादुर्भाव; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

म्हाळुंगे पाडाळे गावाचा महापालिकेत समावेश होऊनसुद्धा अजूनही सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याच्या व्यवस्थेत पूर्णपणे सुधारणा झालेली नाही.
Mosquito menace in Mhalunge due to stagnant water health risk aundh
Mosquito menace in Mhalunge due to stagnant water health risk aundhSakal

औंध : म्हाळुंगे पाडाळे गावाचा महापालिकेत समावेश होऊनसुद्धा अजूनही सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याच्या व्यवस्थेत पूर्णपणे सुधारणा झालेली नाही. अर्धवट काम केलेल्या सांडपाणी वाहिनीतील पाणी येथील सांडीच्या ओढ्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त पाणी जमा झाले आहे.

हे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरत असून पाण्यावर काळे थर जमा झाले आहेत. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी वाहिनी टाकण्यात आली होती.

परंतु, महाळुंगे गावाचा महापालिकेत समावेश झाला व ते कामही अर्धवट राहिले. महापालिकेत आल्यानंतरही त्यात काहीच सुधारणा न झाल्याने येथील रहिवाशांना या घाण पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

जवळपास एक ते दीड एकर परिसरात हे घाण पाणी साचून त्याची दुर्गंधी आजूबाजूला पसरत आहे. महाळुंगे-नांदे रस्त्यावरील सांडीचा ओढा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ओढ्यात सोसायट्यांतील सांडपाणी येऊन तुंबल्याने व त्यातच बेजबाबदार नागरिक कचरा टाकत असल्यामुळे दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे.

महापालिकेत समाविष्ट झालेल्या महाळुंगेवासीयांची दुर्गंधी, घाणपाणी व डासांच्या जाचातून अजूनही सुटका होताना दिसत नाही. मुळा नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीमुळे दुर्गंधी व डासांचा त्रास वाढलेला असतानाच यात अजूनच भर पडत आहे.

तसेच आजूबाजूच्या परिसरात राडारोडा टाकल्याने ओढा अधिकच अरुंद होऊन पाणी तुंबते. यामुळे पावसाळ्यात पाणी जमा होऊन या परिसरात तळे तयार होते. तसेच प्रवाह तुंबल्याने जवळपास एकरभर परिसरात पाणी साचून फुगवटा तयार होतो. त्यामुळे वर्षभर कुठल्या ना कुठल्या प्रकारे येथील घाण पाणी साचून राहते व त्याचा परिणाम इथल्या रहिवाशांच्या आरोग्यावर होतो.

वारंवार पाठपुरावा व मागणी करूनही प्रशासन गांभीर्याने याकडे लक्ष देत नाही. सांडपाण्यामुळे नागरिकांना डासांच्या व दुर्गंधीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

-अमोल मोहोळ, स्थानिक रहिवासी.

संबंधित उपअभियंता व आरोग्य निरिक्षकांना तेथे पाठवून माहिती घेऊन पुढील उपाययोजना केल्या जातील.

-गिरीश दापकेकर, सहाय्यक आयुक्त, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com