मोटारीचा वेग इन्स्टाग्रामवर लाइव्ह दाखवताना तरुणाचा बळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

पिंपरी - आपल्या मोटारीचा वेग मित्रांना दाखविण्यासाठी त्याने सोशल मीडियावर लाइव्ह केले. मोटारीचा वेग आणखी वाढविला आणि नियंत्रण सुटले. अपघातात त्याचा बळी गेला आणि आतेभाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपरी- मोरवाडी येथील ग्रेडसेपरेटरमध्ये रविवारी पहाटे घडली.

पिंपरी - आपल्या मोटारीचा वेग मित्रांना दाखविण्यासाठी त्याने सोशल मीडियावर लाइव्ह केले. मोटारीचा वेग आणखी वाढविला आणि नियंत्रण सुटले. अपघातात त्याचा बळी गेला आणि आतेभाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपरी- मोरवाडी येथील ग्रेडसेपरेटरमध्ये रविवारी पहाटे घडली.

शिवम प्रकाश जाधव (वय 20, रा. खराळवाडी, पिंपरी), असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा आतेभाऊ हृषीकेश विलास पवार (वय 20, रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड) हा गंभीर जखमी झाला. डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवम द्वितीय वर्षात शिकत होता. दुचाकी असो की, चारचाकी वेगात वाहन चालविणे त्याला आवडायचे. त्याचे मामा सतीश कदम कोकणात गावी गेले होते. ते मुंबईत परत जाताना बहीण आणि भाच्याच्या भेटीसाठी शनिवारी दुपारी खराळवाडीत आले होते. रविवारी पहाटे चारच्या सुमारास शिवमने घरातील पाणी भरले. मामाच्या मोटारीची चावी गुपचूप घेतली आणि हृषीकेशला सोबत घेऊन घराबाहेर पडला. चिंचवड स्टेशनकडून वल्लभनगरकडे जाताना मोटारीचा वेग मित्रांना दाखविण्यासाठी त्याने इन्स्टाग्रामवर लाइव्ह केले. हृषीकेशने शिवमवर कॅमेरा केंद्रित केला व स्पीडोमीटरचे शूटिंगही सुरू केले. त्या वेळी मोटारीचा वेग ताशी 120 किलोमीटर होता. तो त्याने आणखी वाढविला. त्यानंतर मोरवाडीजवळ मोटार दुभाजकाला धडकली. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. अपघातानंतर मोटारीची दिशा बदलून तिचे तोंड चिंचवड स्टेशनकडे झाले.

"मदर्स डे'च्या दिवशीच
शिवमच्या वडिलांचे सात वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तो एकुलता एक होता. आजी-आजोबा आणि आईचा लाडका होता. मात्र, मदर्स डेच्या दिवशीच त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे.

आई विसरली नसती तर...
भाच्याला वेगात वाहन चालविण्याची आवड असल्याने तो मोटारीची चावी घेऊन जाईल. त्यामुळे चावी लपवून ठेव, असे शिवमच्या मामाने बहिणीला सांगितले. मात्र, कामाच्या गडबडीत त्या विसरून गेल्या आणि चावी हाती लागताच शिवम मोटार घेऊन घराबाहेर पडला होता.

Web Title: motor accident youth death instagram