दिवस आंदोलनाचा

दिवस आंदोलनाचा

पुणे - कामगार संघटना, राजकीय पक्ष त्याचबरोबर ग्रामस्थ अशा विविध घटकांनी वेगवेगळ्या कारणांसाठी केलेल्या आंदोलनामुळे सोमवारचा (ता. ७ ) दिवस हा आंदोलनाचा दिवस ठरला. महावितरण कर्मचारी, राष्ट्रीय मजदूर संघ, मनसेचे कार्यकर्ते यांच्यासह नारायणगाव, वारूळवाडी ग्रामस्थांनी ही आंदोलने केली.

महापालिकेत कामगारांचे आंदोलन
अधिकारी-कर्मचाऱ्यांबाबत ‘ग्रेड पे’चा प्रश्‍न प्रलंबित असतानाही त्यांना कल्पना न देता पदावनती करण्यात येत आहे, असा आरोप करीत महापालिकेतील कामगारांनी सोमवारी आंदोलन केले. सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणीही त्यांनी केली.  दरम्यान, आंदोलनामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.  

पुणे महापालिका कामगार युनियनने केलेल्या आंदोलनात नेत्या मुक्ता मनोहर, चंद्रकांत गमेर, प्रकाश उरकडली, मोहन गर्दे, अनंत मालक, राकेश विटकर यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले. सर्वसाधारण सभेत ‘ग्रेड-पे’बाबत निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी करावी, कामांच्या वेळा पूर्ववत कराव्यात आदी मागणी त्यांनी केल्या.

महावितरणची सेवा बंदमुळे विस्कळित
 शाखा कार्यालयांची फेररचना करण्याचा महावितरणने घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा, यांसह विविध मागण्यासाठी वीज अभियंते, अधिकारी व कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारी  बंद पाळण्यात आला. त्यामुळे  दिवसभर महावितरणची सेवा विस्कळित झाली होती.

आंदोलनात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या  कंपन्यांतील सुमारे चार हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. 

कामगार नेते विश्‍वास भोसले म्हणाले, ‘‘महावितरणच्या तिन्ही कंपन्यांचा फेररचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत पन्नास टक्‍क्‍यांनी कपात होणार आहे.  या निर्णयास सर्व कर्मचारी वर्गांचा विरोध आहे. यासंदर्भात समितीच्या वतीने आंदोलनाची नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार आज लक्षणिक बंद करण्यात आला.’’

बंदचा काही भागांना फटका
धायरीत सकाळी साडेसातपासून वीजपुरवठा खंडित झाला. तक्रारीची दखल घेण्यास कोणीही तयार नसल्याचे योगेश भुतकर यांनी सांगितले. तुळशीबाग परिसराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याचा विक्रेते नरेश माळवे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com