पुरंदर पंचायत समितीवर प्रहार...गैरव्यवहारांचे आरोप करून महिलेने घेतले कोंडून

दत्ता भोंगळे
सोमवार, 29 जून 2020

प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या राज्य महिला अध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये स्वतःला कोंडून घेऊन आंदोलन केले. 

गराडे (पुणे) : यशवंत निवारा घरकुल योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या योजनेमध्ये पुरंदर तालुक्यामध्ये १६ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप करत प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या राज्य महिला अध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये स्वतःला कोंडून घेऊन आंदोलन केले. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण

याबाबत ढवळे यांनी सांगितले की, पुरंदर तालुक्यामध्ये सन २०१८/१९ मध्ये ३३ दिव्यांग घरकुल मंजूर झाली होती. त्यापैकी ९ दिव्यांग घरकुल अपात्र करण्यात आली. यामध्ये सतीश घाटे यांचा ग्रामपंचायतीमध्ये निधी वर्ग करण्यात आला होता. परंतु, हा निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग न झाल्याने दप्तर दिरंगाई झाली. त्याचबरोबर नीरा येथील एक लाभधारक दिव्यांग नसताना बेघर दाखवून त्याला घरकुल मंजूर करण्यात आले. भोसलेवाडी येथील दोन दिव्यांग व्यक्ती असताना या पूर्वी वडिलांना घरकुल योजनेचा लाभ दिला असून, त्यांना देखील पुन्हा घरकुल मंजूर करण्यात आले. एकाच कुटुंबात दोन घरकुले मंजूर निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला होता. त्यापैकी एका दिव्यांग पत्र दिले, मात्र त्याची रक्कम कोणत्या खात्यामध्ये ठेवली आहे, याचा हिशोब मात्र लागत नाही.   

खेकडे, मासे पकडणाऱ्यांच्या हाती आले टॅब

तसेच, दिव्यांगांसाठी दिला जाणारा उदरनिर्वाह भत्ता हा सन २०१७/१८/१९ या तीन वर्षांमध्ये १५ दिव्यांगांना दोन वेळा लाभ देण्यात आला. तर, एक दिव्यांग बारामती तालुक्यामध्ये राहत असताना घरकुल बारामतीच्या पंचायत समितीकडून घेतले व उदरनिर्वाह भत्ता हा पुरंदर पंचायत समितीकडून वर्ग करण्यात आला आहे. या निधीचा अपहार झाला आहे, असा आरोप करून ढवळे यांनी स्वतःला पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये कोंडून घेतले.
 

दरम्यान, आमदार संजय जगताप यांनी स्वतः पंचायत समितीमध्ये येऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली. 
या वेळी पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, उपसभापती दत्तात्रेय काळे, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार, हरिभाऊ लोंळे, अमोल बनकर उपस्थित होते.
     

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बुधवारी घेणार बैठक 
याबाबत आमदार संजय जगताप यांनी सुरेखा ढवळे यांच्याशी सविस्तर चर्चा करून बुधवारी संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली असून, यात या संपूर्ण विषयावर चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement of Prahar Apang Sanghatana in Purandar Panchayat Samiti