खासदार अमोल कोल्हे म्हणतात, माहिती द्या बघतोच...

dr.jpg
dr.jpg

मंचर : नारायणगाव येथील बाह्यवळण रस्ता, खेड घाटातील कामे संथगतीने सुरू आहेत. या कामांचा वेग वाढवून लवकर कामे पूर्ण करा, तसेच या कामांबाबत वेळीच माहिती द्या, मी काय करायचे ते पाहून घेतो अशा प्रकारचे वक्तव्य खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

पुणे येथे शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित रस्त्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी शनिवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पीएमआरडीए अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली होती.

यावेळी यावेळी राष्ट्रीय महामार्ग पुणे नाशिक विभागचे सुहास चिटणीस, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे डी. व्ही. पठाण, पुणे नगर विभागचे के. बी. दिवाण, सामाजिक बांधकाम विभागचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राहणे उपस्थित होते. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड घाट आणि नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्याची कामे अतिशय संथगतीने सुरू असून, त्या कामांबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

कामात मुरूमाऐवजी मातीचा वापर केला जात असल्याची तक्रार गंभीर असून प्रकल्प संचालकांनी  पाहणी करून संबंधित ठेकेदाराला कडक समज द्यावी असे आदेश खा. डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले.  दाऱ्याघाटाचे पुणे जिल्ह्यातील काम पूर्णत्वास गेले असले तरी ठाणे जिल्ह्यातील कामाला गती मिळण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ठाणे विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दाऱ्याघाटाचे काम प्राधान्याने करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना. डॉ. कोल्हे यांनी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिल्या.

आवश्यकता भासल्यास दोन्ही जिल्ह्यांतील संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करावी आणि यासंदर्भात काही अडचणी असल्यास त्याबाबत सविस्तर टिपणी तयार करून मला द्यावी, म्हणजे त्या अडचणी दूर करण्यासाठी मला प्रयत्न करता येतील असे. डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले. उरण-पनवेल-भीमाशंकर रस्त्याच्या कामाचाही आढावाही यावेळी घेण्यात आला.

या रस्त्याचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. शिरूर लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या अथवा प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांची वेळोवेळी मला सद्यस्थिती कळवावी. पुढील काळात सर्वच रस्त्यांच्या कामांची आढावा बैठक घेणार आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांची माहिती खा. डॉ. कोल्हे यांनी घेतली. येत्या ३ जानेवारीला स्वतंत्र आढावा बैठकीचे आयोजन करावे. या बैठकीत पीएमआरडीएच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा आपण घेणार असल्याचे खा. डॉ. कोल्हे यांनी सांगितले. यावेळी भीमाशंकर परिसरातील विकासकामांचाही आढावा घेण्यात आला. 

आगामी काळात आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांचा विशेषतः पायाभूत प्रकल्पांच्या कामाचा नियमित आढावा घेणार असून सर्वच प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करणार असल्याचे सांगून डॉ. कोल्हे म्हणाले की, कुठल्याही विकासकामात काही अडचणी वा अडथळे आल्यास या संदर्भात वेळीच मला माहिती देण्यात यावी म्हणजे ते दूर करण्यासाठी मला प्रयत्न करता येतील. तसेच राज्याच्या आगामी अर्थसंकल्पातील रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव तयार करून त्याची सविस्तर टिपणी मला तातडीने देण्यात यावी, म्हणजे राज्य सरकारकडे त्याचा पाठपुरावा करणे मला सोयीचे होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com