पुरंदरला खासदार व आमदारांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा

श्रीकृष्ण नेवसे
Sunday, 18 October 2020

-यंदाच्या अतिवृष्टीची तरी सरसकट दखल घेण्याचे उपस्थितांचे आवाहन.

-कोविडमुळे गरजेची मदत लगेच.. बाकी टप्प्या टप्प्याने ः खासदार सुळे 

सासवड ः येथे पुरंदर तालुक्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीच्या आढाव्यात कार्यकर्त्यांनी तीव्रतेने शेतशिवारातील नुकासनीचे चित्र मांडले. तसेच मागील वर्षाच्या अतिवृष्टीतील पंचनामे होऊन बांध, बंधारे, रस्ते नुकसानीची दखल घेतली नाही. या अतिवृष्टीची तरी सरसकट दखल घ्या., अशी मागणी उपस्थितांनी केली. यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या., कोविड 19 मुळे शासनाकडे निधी उपलब्ध असेल त्यानुसार तातडीने गरजेच्या बाबींना मदत मिळेल. बाकी नुकसानीला त्यानंतर प्राधान्य मिळेल. आमदार जगताप म्हणाले, मागील अतिवृष्टीतील शेतकरी नुकसानीची 15 कोटींची मदत आली, सार्वजनिक नुकसानीची मदत राहीली आहे. त्याबाबत व आताच्या नुकसानीचा पाठपुरावा सुरु आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुरंदर तालुक्यातील वादळी वारे व अतिवृष्टीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याकरीता आज तालुका पंचायत समितीच्या सभागृहात आढावा सभा झाली. त्यास खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, तहसिलदार रुपाली सरनौबत, गट विकास अधिकारी अमर माने, तालुका पंचायत समितीच्या सभापती नलीनी लोळे, अशोक टेकवडे, सुदाम इंगळे, माणिक झेंडे, प्रदिप पोमण, दत्ता झुरंगे, दत्ता काळे, सुनिता कोलते, हेमंतकुमार माहूरकर, डाॅ. उत्तमराव तपासे, डाॅ. किरण राऊत, कृषी अधिकारी अंकुश बरडे, मुख्याधिकारी विनोद जळक, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे आदी उपस्थित होते. 

'अंतिम'च्या परीक्षेची अडचणी पाठ सोडेनात; मराठीच्या पेपरमधून पर्यायच झाले गायब!​

यावेळी झालेल्या आढावा सभेत माणिक झेंडे म्हणाले, कांद्यापासून ऊसापर्यंतच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाजीपाला नुकसान मोठी आहे. बापू भोर म्हणाले, जेजुरी ग्रामीणमधील एक पाझरतलाव बिल्डरने फोडला आहे. त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दत्ता चव्हाण म्हणाले, मुळापासून जो ऊस पडला, त्याचा सरसकट पंचनामा व्हावा. सुदाम इंगळे म्हणाले., मागील अतिवृष्टीत नदीपात्राच्या अर्धा कि.मी.पर्यंत नुकसान झाले. त्यातून शेतकरी सावरले नाही, तोच हे यंदाचे नुकसान मोठे आहे. दोन्ही भरपाई शेतकऱयांना मिळाली पाहिजे.

माजी आमदार टेकवडे म्हणाले, अधिकाऱयांनी फक्त उत्तर देण्याएेवजी पंचनामे शंभर टक्के करावेत. शासनाकडून भरपाई निधी मिळविण्याचे काम खासदार व आमदारांनी करावे. कोलमडलेला शेतकरी उभा झाला पाहिजे.

दरम्यान, गट विकास अधिकाऱयांनी सांगितले की, तालुक्यात अतिवृष्टी, वारा व पुराने सातही मंडलात मोठे नुकसान झाले. 48 घरांची पडझड, अकरा स्मशानभूमी, अठरा बंधारे फुटले, अठरा डांबरी रस्ते उखडले. त्याबाबत प्रशासनाने भेटी दिल्या. तहसिलदार सरनौबत म्हणाल्या., सर्वच गावात पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कोविडमधील रुग्णालयांत महात्मा फुले जनआरोग्य योजना नसणे, शेतकऱयांना वीज वेळेत न मिळणे, पंचनाम्यात शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याबाबतचे प्रश्नही मांडले गेले.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP supriya sule and MLA jagtap took stock of the heavy rains in Purandar