खासदार सुप्रिया सुळे... तमाशा कलावंत...अन्...

रमेश वत्रे
Wednesday, 12 August 2020

वाखारी (ता. दौंड) येथील न्यू अंबिका कला केंद्रातील कलावंतांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने अन्नधान्याचे किट आज देण्यात आले.

केडगाव : वाखारी (ता. दौंड) येथील न्यू अंबिका कला केंद्रातील कलावंतांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने अन्नधान्याचे किट आज देण्यात आले. राज्यातील ज्येष्ठ तमाशा कलावंतांना सुळे यांच्या प्रयत्नातून निवृत्ती वेतन मिळवून देणार असल्याचे आश्वासन बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक प्रवीण शिंदे यांनी आज दिले. कलावंतांना मदत केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आश्वासन दिले.

देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर

कोरोनामुळे गेली साडेचार महिने लॅाकडाऊन सुरू आहे. राज्यातील कलाकेंद्र बंद असल्याने कलावंतांचा रोजगार बंद झाला आहे. राज्यातील सुमारे १५ हजार कलावंत सध्या बरोजगारीचा सामना करत आहेत. राज्यातील अनेक व्यवसाय आता सुरू झाले आहेत.या पार्श्वभुमीवर राज्य थिएटर मालक संघाचे अध्यक्ष डॅा. अशोक जाधव, जयश्री जाधव, अभयकुमार मुसळे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली होती. याबाबत सांस्कृतिक मंत्री यांच्याबरोबर बैठक घेऊन काही अटींवर कलाकेंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन पवार यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

या भेटीनंतर कलाकारांच्या मागणीची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी वाखारीतील कलावंतांना एक महिन्याचा किराणा आज दिला. मदत मिळाल्यानंतर अशोक जाधव व जयश्री जाधव यांनी यांनी खासदार सुळे यांचे आभार मानले. जाधव म्हणाले, या मदतीची गरज होती. मात्र सरकारने नियम व अटींवर कलाकेंद्र सुरू केली पाहिजेत. नियम व अटींचे आम्ही पालन करू. कला केंद्र सुरू केली तर राज्यातील कलावंतांची उपासमार थांबेल.

प्रवीण शिंदे म्हणाले, राज्यातील अनेक लोकवंत पेन्शनसाठी पात्र आहेत, मात्र कागदपत्रे व पाठपुराव्या अभावी त्यांना पेन्शन मिळत नाही. अशा कलावंतांना पेन्शन मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केले जातील. तमाशा कला केंद्र सुरू करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे व सांस्कृतिक मंत्री यांच्यात बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडविले जातील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, पक्षाचे समन्वयक प्रवीण शिंदे, जेजुरी नगर परिषदचे नगरसेवक मेहबूब पानसरे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण सातपुते, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास खळदकर, शहर युवक अध्यक्ष सचिन गायकवाड, अल्पसंख्याक शहर युवक अध्यक्ष अल्ताफ मुलानी, भानुदास नेवसे, अजित शितोळे, लक्ष्मण दिवेकर, संतोष शेळके, उद्धव फुले, बाळासाहेब धायगुडे, विक्रम साबळे, न्यू अंबिका कला केंद्राचे प्रमुख अशोक जाधव उपस्थित होते.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Supriya Sule's help to Tamasha artists