तीन पदांसाठी एकच पूर्वपरीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

वेगवेगळ्या पदांसाठी वेगळी परीक्षा घेतल्यास अडचणी वाढतात. या परीक्षा इतर परीक्षांच्या तारखेला येणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागते. काही वेळा दोन परीक्षा एकाच तारखेला आयोजित केल्या जातात. नव्या निर्णयामुळे तो त्रास टळणार आहे.
- व्ही. एन. मोरे, अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

राज्य लोकसेवा आयोगाचा निर्णय; पुढील वर्षापासून अंमलबजावणी
पुणे - पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयीन सहायक कक्ष अधिकारी या पदांची पूर्वपरीक्षा राज्य लोकसेवा आयोग पुढील वर्षापासून संयुक्तपणे घेणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना तिन्ही पदांसाठी एकाच वेळी परीक्षा देता येईल. या पदांच्या मुख्य परीक्षा मात्र वेगवेगळ्या द्याव्या लागणार आहेत.

कोणत्याही पदासाठी होणारी आयोगाची परीक्षा यापूर्वी वेगवेगळी द्यावी लागत होती. त्यामुळे इच्छुकांना दरवेळी परीक्षा केंद्रावर जावे लागत होती, केंद्र असलेल्या ठिकाणी मुक्कामाची सोय करून घ्यावी लागत होती. तीन वेगळ्या परीक्षांसाठी परीक्षार्थींचा वेळही वाया जाण्याबरोबरच परीक्षांचे आयोजन आणि व्यवस्था करण्यासाठी सरकारी यंत्रणेवर ताणही पडत होता. त्यामुळे आयोग या तीनही पदांसाठी संयुक्त परीक्षा घेणार आहे.

आयोगाचे अध्यक्ष व्ही. एन. मोरे म्हणाले, 'संयुक्त परीक्षा एकच आणि एकाच दिवशी असल्याने परीक्षा देणाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल. प्रत्येक परीक्षा वेगळी देताना त्यांना वेगवेगळे शुल्क भरावे लागत होते.

परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या वेळी यावे लागत असल्याने उमेदवारांचा खर्चही होत होता. संयुक्त परीक्षा पद्धतीमुळे इच्छुकांचा त्रास वाचणार आहे. तसेच परीक्षेचे आयोजन करण्यात यंत्रणेचा जाणारा वेळही वाचेल.''

'संयुक्त पूर्वपरीक्षेचा तीनही पदांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. प्रश्‍न, घटक यांच्या गुणांचा भार, परीक्षेचा वेळ हे सर्व सारखेच आहे. त्यामुळे तीनही पदांची परीक्षा एकत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे आठ वर्षांपूर्वी संयुक्त परीक्षा घेतली जात होती. मध्यंतरीच्या काळात ही पद्धत बंद झाली होती. परंतु उमेदवारांच्या दृष्टीने संयुक्त परीक्षा सोयीची असल्याने पुढील वर्षीपासून ही पद्धत पुन्हा सुरू केली जात आहे.''

अशी होईल परीक्षा
- पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयीन सहायक कक्ष अधिकारी या पदांसाठी एकाच प्रश्‍नपत्रिकेद्वारे परीक्षा. संभाव्य तारीख 16 जुलै 2017
- परीक्षेचा अर्ज भरताना किती पदांसाठी परीक्षा द्यायची आहे, हे निश्‍चित करता येणार आहे. निकालही लवकर जाहीर होणार
- पूर्वपरीक्षेतील तीनही पदांचे निकाल वेगवेगळे जाहीर केले जाणार. मुख्य परीक्षा मात्र वेगवेगळ्या होणार
- पूर्वपरीक्षेत तीनही पदांसाठी पात्र ठरल्यास मुख्य परीक्षा कोणत्या पदासाठी द्यायची, हेही ठरविता येणार
- पूर्वपरीक्षा तीन पदांसाठी दिल्यानंतर त्यात पात्र ठरल्यास मुख्य परीक्षादेखील तीनही पदांसाठी देण्याची मुभा

Web Title: mpsc prelims exam for three post