लोकसेवा आयोगातील पदभरती कधी? 

लोकसेवा आयोगातील पदभरती कधी? 

पुणे : राज्य सरकारच्या विविध विभागांत अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी लेखी परीक्षा, मुलाखती, अशी प्रक्रिया राबविणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग गेल्या सहा महिन्यांपासून अध्यक्षाविना सांभाळला जात आहे. तर, आयोगात पाच सदस्यांच्या जागा असून, सध्या केवळ दोनच सदस्य आहेत. त्यामुळे आयोगात पदभरती होणार कधी?, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष विठ्ठल मोरे हे मे 2018 मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर आजतागायत आयोगातील अध्यक्षपद रिक्त आहे. त्यांच्याशिवाय आयोगात आणखी पाच सदस्य असतात. त्यातील चार सदस्य यापूर्वीच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे सध्या केवळ दोन सदस्यांवरच कारभार सुरू आहे. चंद्रशेखर ओक आणि दयानंद मेश्राम हे दोनच सदस्य सध्या आयोगात आहेत. अध्यक्षपद रिक्त असताना वरिष्ठ सदस्याकडे अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार दिला जातो. त्याप्रमाणे ओक यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आयोगाचा संपूर्ण कार्यभाराचा डोलारा सध्या केवळ दोन सदस्यांमार्फतच सांभाळत आहे. 

पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी सध्या मुलाखती सुरू आहेत. पुण्यातील मुलाखती नुकत्याच संपल्या असून, आगामी काही दिवसांत कोल्हापूर, अमरावती, नागपूर अशा अनेक जिल्ह्यांतील पोलिस उपनिरीक्षकपदासाठीच्या मुलाखती होणे अपेक्षित आहेत. त्यानंतर एक-दीड महिन्यात राज्य सेवा परीक्षेच्या मुलाखतीचे सत्र सुरू होईल. आयोगाने नुकतेच 2019मध्ये होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. 2019 या वर्षातील परीक्षेचे 'बिझी शेड्यूल' पाहता केवळ दोनच सदस्यांच्या जोरावर कार्यभार कसा सांभाळला जाणार, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. 

''राज्य लोकसेवा आयोगामार्फत विविध परीक्षा आणि मुलाखतीद्वारे अधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया होते. आयोगाच्या पदभरतीबाबत दफ्तर दिरंगाई का? राज्य सरकारातील विविध विभागांमध्ये कुशल अधिकाऱ्यांची नेमणूक करणाऱ्या यंत्रणेतच पदभरती होत नाही, ही खेदाची बाब आहे.'' 
- महेश बडे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com