
महावितरणने पकडली 25 लाखांची वीजचोरी
बारामती : येथील महावितरणच्या भरारी पथकाने भोर तालुक्यातील (जि. पुणे) मे. बालाजी वायर्स या कारखान्यामध्ये भूमिगत केबलमध्ये फेरफार करून सुरु असलेली 25 लाख 48 हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. वीजचोरी व दंडाच्या एकूण 36 लाख 18 हजार रुपयांचे वीजबिल या कारखान्यास देण्यात असून कारखान्याच्या मालकाविरुद्ध पुढील फौजदारी कारवाई सुरु करण्यात आली आहे. (Baramati News)
महावितरणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवरे (ता. भोर, जि. पुणे) येथे मेसर्स बालाजी वायर्स या कारखान्यात स्टील वायरची निर्मिती केली जाते. या कारखान्यासाठी ग्राहकाच्या मागणीनुसार महावितरणकडून 100 अश्वशक्ती क्षमतेची उच्चदाब वीजजोडणी देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात या कारखान्यातील वीजवापरावरून संशय निर्माण झाला होता.
त्यानुसार महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकाने या कारखान्यातील वीजमीटर व संचाची 28 जुलै रोजी तपासणी केली. यामध्ये मीटरला येणाऱ्या भूमिगत केबलला टॅपिंग करून अनधिकृत वीजवापर सुरु असल्याचे आढळून आले. तसेच 107 अश्वशक्ती जोडभाराचा अनधिकृत वीजवापर देखील आढळून आला. गेल्या 21 महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकारामध्ये 1 लाख 40 हजार 56 युनिटची म्हणजे 25 लाख 48 हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे निदर्शनात आले.
हेही वाचा: 'देशात पॉर्न पाहण्याचं कारणं सनी लिओनी, तिच्यावर कारवाई का नाही?'
वीजचोरी प्रकरणी महावितरणकडून बालाजी वायर्स कारखान्याला दंडाचे 10 लाख 70 हजार रुपये आणि वीजचोरीचे 25 लाख 48 हजार रुपयांचे बिल देण्यात आले आहे. तसेच कारखान्याच्या मालकाविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
ही वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता आवधकिशोर शिंदे, कनिष्ठ अभियंता कैलास काळे, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी अश्विनी भोसले, तंत्रज्ञ गणेश कराड यांनी मोलाची कामगिरी बजावली.
Web Title: Mseb Nabs Power Theft Worth Rs 25 Lakh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..