नव्या वीजजोडचा गोंधळ मिटेना; महावितरणचा दावा एक मात्र वस्तुस्थिती वेगळीच!

Mahavitaran_Meter_Connection
Mahavitaran_Meter_Connection

पुणे : नवीन वीजजोड देताना आकारण्यात येणाऱ्या सर्व्हिस कनेक्‍शन चार्जेस (वीजजोड) संदर्भात महावितरणच्या स्तरावरील गोंधळ अद्याप मिटण्यास तयार नाही. मार्चपूर्वी पाच किलोवॅटपर्यंत 3 हजार 100 रुपये, तर पाच ते दहा किलोमीटर पर्यंत 7 हजार 150 रुपये शुल्क आकारले जात असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र सात किलोवॅटपर्यंत वीजजोड देण्यासाठी 3 हजार 100 रुपयेच शुल्क आकारले गेले असल्याची कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. 

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मार्चपूर्वी 7.5 किलोवॅट क्षमतेच्या सिंगल फेज भूमिगत नवीन वीजजोडणीसाठी 7 हजार 150 रुपये दर निश्‍चित केलेले आहेत. मात्र, महावितरणकडून प्रत्यक्षात 3 हजार 100 रुपयांची आकारणी करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे वृत्त 'सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. त्यावर महावितरणने पत्रक काढून आपली बाजू मांडली आहे. 

मार्चपूर्वी 5 किलोवॅट व 5 किलोवॅटपेक्षा अधिक अशा दोनच वर्गवारीतील सिंगल फेज वीजजोडणीसाठी आयोगाने दर निश्‍चित केले होते. 12 सप्टेंबर 2018 मध्ये आयोगाने दिलेल्या आदेशावरून मुख्य अभियंता (वितरण) यांनी काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे भूमिगत सिंगल फेजच्या नवीन वीजजोडणीसाठी 5 किलोवॅटपर्यंत 3 हजार 100 रुपये आणि 5 ते 10 किलोवॅटपर्यंत 7 हजार 150 रुपये असे दर आकारणीचे निर्देश दिले होते.

त्यामुळे पुणे परिमंडळात मार्चपर्यंत भूमिगत सिंगल फेजच्या 5 किलोवॅटपर्यंतच्या नवीन वीजजोडणीसाठी 3100 रुपये दर आकारण्यात आला आहेत. आयोग आणि महावितरणच्या परिपत्रकाप्रमाणे दर आकारणी करण्यात आल्याने कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही, असा दावा महावितरकडून पत्रकात करण्यात आला आहे. 

प्रत्यक्षात मात्र 'सकाळ'च्या हाती आलेल्या कागदपत्रानुसार महावितरणकडून 7 किलोवॅट वीजजोड देण्यासाठी 3 हजार 100 रुपये या प्रमाणेच सर्व्हिस कनेक्‍शन चार्जेस आकारण्यात आले असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे, तर दोन किलोवॅटपर्यंत वीजजोड देण्यासाठी 3 हजार 100 रुपये शुल्क आकारणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र 3 हजार रुपयेच सर्व्हिस कनेक्‍शन चार्जेस आकारण्यात आले असल्याची कागदपत्रे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे परिपत्रकातील दर एक आणि आकारणी मात्र दुसऱ्याच दराने होत असल्याचे पुन्हा एकदा महावितरणने केलेला खुलासा आणि प्रत्यक्षात होत असलेली शुल्काची आकारणी यावरून समोर आले आहे. 

महावितरणने आयोगापुढे सादर केलेल्या दरवाढीच्या प्रस्तावात भूमिगत नवीन वीजजोडसाठी 0.5 किलोवॅटपर्यंत 3 हजार 100 रूपये चार्जेस असून ते 3 हजार 630 रूपये करावे, असे म्हटले आहे. तर 0.5 ते 7.5 किलोवॅटपर्यंतचे शुल्क 7 हजार 150 वरून 8 हजार 30 पर्यंत वाढीस मान्यता द्यावी, असे म्हटले आहे. यावरून मार्चपूर्वी महावितरणकडून हेच दर आणि हेच दोन स्लॅब असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com