चिखलामुळे आयटीयन्स बेजार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

बीआरटी रस्त्यावर चिखल झाला असून, दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांसाठी रस्ता धोकादायक झाला आहे.

नवी सांगवी- दिवाळी संपली, तरी पावसाचा जोर कायम आहे. त्याचा फटका केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेल्या पिंपळे सौदागर परिसरालाही बसला आहे. प्रशस्त बीआरटी रस्त्यावर चिखल झाला असून, दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांसाठी रस्ता धोकादायक झाला आहे. त्यामुळे ‘पाऊस थांबता थांबेना, रस्त्यांवरचा चिखल कमी होईना’ अशी अवस्था आहे. 

पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे निलख, वाकड, पिंपळे गुरवचा काही भाग म्हटले की आठवते स्मार्ट सिटी योजना. या भागात बहुतांश आयटीयन्स राहतात. टोलेजंग इमारती व हजारांवर सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्या. परदेशात गेल्याचा भास व्हावा, असे येथील रस्ते, दुकानांची रचना. मात्र पावसामुळे या भागातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिवाळीच्या आनंदावर पावसाने विरजण घातले. त्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, त्या कामकाजात अडकलेले अधिकारी व कर्मचारी. यामुळे नागरी सुविधांबद्दल कोणाकडे विचारणा करायची, या विचाराने हतबल झालेला सामान्य माणूस अशी येथील स्थिती होती. आता निवडणूक संपली. निकाल जाहीर झाला. आचारसंहिता शिथिल झाली. आता तरी महापालिका प्रशासनाने नागरी प्रश्‍नांच्या सोडवणुकीला प्राधान्य देण्याची गरज असल्याची भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

ही आहे वस्तुस्थिती
पिंपळे सौदागरमधील पी. के. चौकानजीक बीआरटी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या कडेला लिनियर गार्डनचे काम सुरू असून, त्याच जागेतून काही खासगी जड वाहनांची ये-जा सुरू असते. परिणाम, त्यांच्या चाकाला लागलेला चिखल रस्त्यावर येत असल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. शिवाय, दिवसा ऊन पडल्याने रस्ता सुखतो. आणि सायंकाळनंतर आलेल्या पावसाने पुन्हा चिखलाचा होता. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही कसरत करून चालावे लागत आहे. हीच स्थिती स्वराज चौकाशेजारील यशवंतनगरमधील आहे. येथील भूखंडावर कोणीतरी राडारोडा आणून टाकत आहे. पावसामुळे त्यातील माती, बारीक दगड रस्त्यावर पसरले आहेत. तेथील परिसराला बकाल स्वरूप आले असून रस्ता धोकादायक झाला आहे.

‘सारथी’वर  तक्रार निरुपयोगी
पिंपळे सौदागरमधील रस्त्यांवर पसरलेल्या चिखलाबाबत आणि रस्त्याच्या कडेला टाकल्या जात असलेल्या राडारोड्याबाबत काही नागरिकांनी महापालिकेच्या ‘सारथी’ हेल्पलाइनवर तक्रारी नोंदविल्या आहेत. मात्र, उपाययोजना होत नसल्याने येथील रहिवाशांनी ‘सकाळ’कडे गाऱ्हाणे मांडले. धोकादायक रस्त्याच्या संकटातून सुटका व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mud on BRT road