मुळा नदीच्या काठांवरील जैवविविधता संवर्धन करा

मुळा नदीच्या काठांवरील जैवविविधता संवर्धन करा
Published on

पिंपरी, ता. १४ ः मुळा नदीच्या दोन्ही काठांवर समृद्ध जैवविविधता आहे. तिचे संवर्धन करण्याची मागणी ‘पिंपरी चिंचवड रिव्हर रिव्हायवल’च्या शिष्टमंडळाने गुरुवारी केली.
महापौर रवी लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बागडे यांची एकत्रित भेट घेऊन मुळा नदी संवर्धनाच्या निकडीबाबत शिष्टमंडळाने निवेदन दिले. तसेच काय करायला हवे, याबाबत सादरीकरणही केले. शिष्टमंडळामध्ये सूर्यकांत मुथियान, शैलजा देशपांडे, प्राजक्ता महाजन, संजीव नाईक, राहुल करंबेळकर, कल्याण माने, शुभम पांडे, तुषार शिंदे आदींचा समावेश होता. त्यांनी नदी काठांवरील पर्यावरणीय घटकांवर प्रकाश टाकला. यात विविध प्रकारची वने, गवताळ भाग आणि पाणथळ जागा आदींचा समावेश होता. नदीकाठांवरील अधिवासांवर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी साकडे घातले. नद्यांच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक, पारदर्शक व लोकसहभागावर आधारित नियोजनाचा आग्रह धरला. नद्यांची स्वच्छता आणि त्यांचे पुनरुज्जीवन या बाबींना इतर सर्व गोष्टींपेक्षा अग्रक्रम दिला गेला पाहिजे, याकडे लक्ष वेधले. दरम्यान, नदीकाठच्या समृद्ध परिसंस्थेचे संरक्षण व संवर्धन सुनिश्चित केले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे शिष्टमंडळाने कळविले.

Marathi News Esakal
www.esakal.com