पुणे - पुणे शहराची तहान वाढत असताना मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी कोटा मंजूर व्हावा, यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. त्यातच पिंपरी-चिंचवडचीही भविष्यातील वाढ पाहता या शहरालाही मुळशीचे पाणी मिळावे, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
दौंड, इंदापूर या ग्रामीण भागातूनही सिंचनासाठी मुळशीच्या पाण्याची मागणी होत आहे. त्यामुळे १८.५ टीएमसी क्षमतेच्या मुळशी धरणाचे पाणी कोणाकोणाला आणि कसे कसे द्यायचे याचे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या पुण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून एक पाऊल पुढे टाकणे आवश्यक आहे.
1) मुळशीतून हवे जादा ५ टीएमसी
पुणे शहरातील बहुतांश भाग हा खडकवासला धरणावर अवलंबून आहे. या धरणाची क्षमता २९ टीएमसीची असताना दरवर्षी पाण्याची मागणी वाढत आहे. या धरणातून पुणे जिल्ह्यात शेतीसाठी पाणी सोडले जाते, तसेच पुण्यासाठीही पुरेसा पाणीसाठा शिल्लक ठेवावा लागतो. पाणी वापर कमी व्हावा यासाठी पाणी कपात करण्याचा इशाराही पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला दिला जातो. सध्याची शहराची स्थिती पाहता पाण्याची मागणी कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. यामुळेच पुणे महापालिकेच्या मुख्य सभेने ऑगस्ट २०२१ मध्ये मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी मिळावे, असा ठराव करून तो राज्य शासनाकडे पाठवला आहे.
2) निर्णय लवकर अपेक्षित; अन्यथा गंभीर टंचाई
मुळशी धरणातून शहरासाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि लगेच पाणी उपलब्ध होते असे नाही. त्यासाठी पुणे महापालिकेला धरणापासून पुणे शहरापर्यंत जलवाहिनी टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र, जॅकवेल उभारणे यासह अन्य कामे करण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. खडकवासला धरणाच्या पाणी वापरावर मर्यादा येणार आहेत, समाविष्ट गावांना पुरेसे पाणी मिळत नाही, अशा स्थितीत मुळशी धरणातील पाणी लवकर उपलब्ध झाल्यास पुणे शहराला दिलासा मिळेल; अन्यथा गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
3) पिंपरी-चिंचवडचाही मुळशीवरच भर
पिंपरी-चिंचवड महापालिकेला पवना, भामा आसखेड आणि आंद्रा या तीन धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी सध्या प्रमुख भार हा पवना धरणावर आहे. काही प्रमाणात आंद्रा धरणातून पाणी मिळत असल्याने दिवसाला ६५० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. मात्र भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी जलवाहिनीचे काम अजूनही अर्धवट आहे. त्यामुळे या शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहराला मुळशी धरणातून पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी येथील लोकप्रतिनिधींनी केली आहे. यासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनादरम्यानच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक होणार आहे, असे सांगितले जाते.
4) ग्रामीण भागालाही हवे मुळशीचे पाणी
खडकवासला धरणातून पुणे शहरासाठी पाण्याचा वापर दरवर्षी वाढत आहे. दौंड, इंदापूर भागांत खडकवासला धरणातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. मात्र भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता या भागातील शेती, गावांना पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे या भागातील आमदारांनी मुळशीचे पाणी दौंड, इंदापूरसाठी राखीव ठेवावे, अशी मागणी केलेली आहे.
5) धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव
मुळशी धरण हे १८.५ टीएमसी क्षमतेचे आहे. पुणे शहरासह पीएमआरडीएच्या हद्दीत वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता आगामी ३० वर्षांचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविल्यास धरणाची क्षमता २० टीएमसीपेक्षा जास्त होऊ शकते. धरणाची उंची वाढविल्यास शेतजमीन पाण्याखाली जाऊ शकते. त्यामुळे याचा किती शेतकऱ्यांना फटका बसेल, याबाबत पाटबंधारे विभागाकडून अभ्यास केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.