मुंबई बॉंबस्फोट प्रकरणातील ताहिर मर्चंटचा मृत्यू

Tahir-Merchant
Tahir-Merchant

पुणे - मुंबई बॉंबस्फोट प्रकरणातील फाशीची शिक्षा झालेला ताहिर मर्चंटचा ससून रुग्णालयात बुधवारी पहाटे उपचारापूर्वी मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्‍याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील साखळी बॉंबस्फोट प्रकरणाचा सूत्रधार आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा ताहिर हा निकटचा साथीदार होता.

बॉंबस्फोटप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या ताहिरला (वय 63) विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आज पहाटे तीनच्या सुमारास छातीत दुखत असल्याची तक्रार ताहिरने तुरुंग रक्षकाकडे केली. त्यानंतर त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले. पहाटे पावणेचार वाजता ताहिरला मृत घोषित करण्यात आले. ""ताहिरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्‍याने झाल्याची शक्‍यता आहे. पार्थिवाच्या मरणोत्तर तपासणीचा अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूमागचे नेमके कारण समजू शकेल,'' असे कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले.

मुंबईत 12 मार्च 1993 रोजी साखळी बॉंबस्फोट झाले होते. एकूण बारा ठिकाणी झालेल्या बॉंबस्फोटात 257 नागरिक मृत्युमुखी पडले होते. या बॉंबस्फोटात सुमारे 758 नागरिक जखमी झाले होते. बॉंबस्फोट घडविण्यात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हात असल्याचे निष्पन्न झाले होते. बॉंबस्फोट घडविण्यासाठी लागणारी साधनसामग्री जमविण्यात ताहिर मर्चंटचा सहभाग होता. विशेष न्यायालयाने ताहिरला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. बॉंबस्फोट खटल्यात दाऊद इब्राहिम, टायगर मेमन यांच्यासह वीस आरोपी फरारी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com