मुंबई-पुणे रेल्वेसेवा झाली सुरू

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या 16 ऑगस्टपर्यंत रद्द राहणार असल्याचे यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. लांब पल्ल्याच्या विविध गाड्याही रद्द करण्यात आल्याने प्रवासी वैतागले होते. पावसाने रेल्वेवरही परिणाम झाल्याने प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत होती. पण आज मुंबई-पुणे रेल्वेसेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

मुंबई : गेले काही दिवस मुसळधार पावसामुळे ठप्प असलेली मुंबई-पुणे रेल्वेसेवा काल (ता. 16) पूर्ववत झाली. मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली. मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या आजपासून पुन्हा धावतील.

मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या 16 ऑगस्टपर्यंत रद्द राहणार असल्याचे यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. लांब पल्ल्याच्या विविध गाड्याही रद्द करण्यात आल्याने प्रवासी वैतागले होते. पावसाने रेल्वेवरही परिणाम झाल्याने प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत होती. पण आज मुंबई-पुणे रेल्वेसेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेवरील कर्जत-लोणावळादरम्यान घाट क्षेत्रात दरड कोसळण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडल्या होत्या. त्यामुळे या स्थानकांदरम्यान 26 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत विशेष ब्लॉक घेऊन कामे करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. परंतु 2 ऑगस्टपासून पुन्हा पडलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत ते लोणावळा भागांत तीन ठिकाणी दरड कोसळणे, पाणी साचून मोठा फटका बसला आणि 3 ऑगस्टपासून मुंबई ते पुणे मार्ग पूर्णपणे बंदच ठेवावा लागला. परंतु आता हा मार्ग पूर्ववत झाल्याने मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

(प्रातिनिधिक‌ फोटो. बातमीचे फोेटो सौजन्य : प्रितेश कुलकर्णी)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Pune Railway service starts from today