महापालिकेतर्फे 40 हजार व्यापाऱ्यांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

पुणे - महापालिकेच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागातर्फे 40 हजार व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मागील तीन वर्षांत नियमानुसार विवरणपत्र सादर न केल्याबद्दल या व्यापाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच विक्रीकर विभागाकडून संबंधित व्यापाऱ्यांच्या वार्षिक उलाढालीची माहितीही मागविण्यात आली आहे. या सर्व व्यापाऱ्यांना पाच हजार रुपये दंडसुद्धा ठोठावण्यात आला आहे.

महापालिकेने सन 2013-14, 14-15 आणि 15-16 या तिन्ही आर्थिक वर्षांत विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या माहितीचे संकलन करून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, असे एलबीटी विभागप्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले. ठोठावण्यात आलेला दंड व्यापाऱ्यांनी तातडीने भरायचा असून, हा दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांची सर्व माहिती विक्रीकर विभागाकडून मागविण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे विहित मर्यादेबाहेर उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, असे विभागातर्फे सांगण्यात आले.

शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी या कराला विरोध केला होता. मात्र, त्याची दखल न घेता सरकारने पालिकांना कर वसूल करण्यास सांगितले. आर्थिक वर्ष संपल्यानंतरच्या चार महिन्यांमध्ये विवरणपत्र सादर करणे अपेक्षित असते. पण, सरकारने एलबीटीची मर्यादा शिथिल केल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आर्थिक विवरणपत्र पालिकेकडे सादर करणे टाळले. अशा सर्वांनाच आता पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

एलबीटी भरण्यासाठी नोटा चालणार
रद्द झालेल्या एक हजार व 500 रुपयांच्या नोटा शासकीय कर जमा करण्यासाठी स्वीकारण्यात येतील, असे जाहीर झाल्यामुळे एलबीटी विभागाकडूनही या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत, असे मोळक यांनी सांगितले. दरम्यान, एलबीटीवरील एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभाराची रक्कम सरकारकडून पालिकेला दिली जाते. सन 2015-16 या वर्षातील सुमारे 28 कोटी रुपयांचा निधी पालिकेला मिळणे अपेक्षित होते. परंतु, त्यापैकी निम्मीच रक्कम महापालिकेला प्राप्त झाली आहे. उर्वरित 14 कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. येत्या काही दिवसांत ही रक्कम पालिकेच्या खात्यावर जमा होईल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Municipal Corporation 40 thousand traders notice

टॅग्स