esakal | पुणे : वाहनतळ चालकास महापालिकेने लावला दोन लाखाचा दंड
sakal

बोलून बातमी शोधा

Parking Rate

पुणे : वाहनतळ चालकास महापालिकेने लावला दोन लाखाचा दंड

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - मंडईतील बाबू गेनू (आर्यन) वाहनतळाच्या ठिकाणी अधिकृत दरपत्रक न लावल्याने ठेकेदारास महापालिकेने २ लाख १४ हजार रुपयांचा दंड लावला आहे. नागरिकांकडून तिप्पट पैसे वसूल करणे अरेरावी करणे यावर खुलासा करण्यासाठी नोटीस बजावली असून, त्यानंतर आणखी दोन लाख रुपयांचा दंड लावला जाणार आहे.

बाबू गेनू वाहनतळावर नागरिकांची लूट सुरू असल्याचे वृत्त आज (बुधवारी ) ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले. त्यामध्ये दुचाकीसाठी प्रतितास तीन रुपये ऐवजी १० रुपये व चारचाकीसाठी प्रतितास १४ रुपये ऐवजी २० रुपये घेतले जात असल्याचे समोर आले. यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने त्वरित पाऊल उचलत वाहनतळ चालकास नोटीस बजावली आहे. तसेच प्रतितास शुल्क किती आहे याची व तक्रार कुठे करायची आहे याची माहिती लिहिण्यात आली.

हेही वाचा: Indapur : प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभासदांना कर्ज वाटप

या वाहनतळासाठी ठेकेदाराकडून महापालिकेला प्रतिमहिना सुमारे ४ लाख रुपये भाडे प्राप्त होते. त्याने महापालिकेने केलेल्या करारामध्ये जो दर निश्‍चीत केला आहे तेवढेच पैसे घेतले पाहिजेत. तेथील कर्मचाऱ्यांनी चांगले वर्तन ठेवले पाहिजे, पण या अटींचा भंग झाला आहे. त्यामुळे लेखी समज देऊन मासिक भाडे रकमेच्या ५० टक्के दंड आकारण्यात येतो. दुसऱ्यांदा भंग केल्यास पुन्हा लेखी समज देऊन मासिक भाड्याच्या १०० टक्के रक्कम दंड म्हणून घेतली जाते. त्यानंतरही वर्तन सुधारले नाही व तक्रार आली तर करार रद्द करून महापालिका वाहनतळ ताब्यात येते, असे करारात नमूद केले आहे. या ठेकेदाराविरोधात यापूर्वी एका नागरिकाने तक्रार केली होती, त्यानुसार ही दुसरी नोटीस असल्याने मासिक भाड्याच्या ५० टक्के रकमेचा दंड केला जाणार आहे. तर वाहनतळाच्या पहिल्या मजल्यावर दराचा तपशील न लिहिल्याने २ लाख १४ हजार रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.

‘महापालिकेने निश्‍चीत केलेला दरानुसारच पार्किंग शुल्क घेतले पाहिजे तसेच दर किती आहेत याचा तपशील वाहनतळात लिहिणे अनिवार्य आहे. ठेकेदाराच्या कामगारांनी नागरिकांनी व्यवस्थित बोलले पाहिजे. याचे उल्लंघन केल्याने ठेकेदाराला नोटीस बजावून दंड लावला आहे.नागरिकांना वाईट अनुभव येत असल्यास त्यांनी न घाबरता कारवाई करावी, आमच्याकडून त्वरित कारवाई केली जाईल. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करू.’’

- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

हेही वाचा: 'असे काम करा की', पक्ष तुमच्याकडे पदे घेऊन येईल- खा. सुप्रिया सुळे

याठिकाणी करा तक्रार

- ९६८९९३१७१५, ९६८९९३१६७६ ९६७३७३८०८०

- ceproject@punecorporation.org

यापूर्वीही दिले होते कारवाईचे आदेश

मार्च २०२१ मध्ये एका नागरिकाला बाबू गेनू वाहनतळातील कर्मचाऱ्यांनी जादा पैसे घेऊन गैरवर्तन केले होते. त्याबद्दल या नागरिकाने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. महापौरांनी प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठेकेदारास नोटीस बजावली होती, पण त्यानंतरही ठेकेदाराच्या कामात सुधारणा झालेली नाही.

loading image
go to top