महापालिकेची ‘सायकल’ पंक्‍चर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

पुणे - शहरातील रस्त्यांच्या लांबीच्या निम्मा म्हणजे, तब्बल ८२४ किलोमीटरचा सध्या सायकल ट्रॅक आहे. परिणामी, रस्तोरस्ती पुन्हा सायकलीच सायकली दिसतील, त्याकरिता पहिला टप्पा म्हणून ५० कोटींची तरतूद... काही वर्षांत एक लाख सायकली रस्त्यांवर धावतील... हे चित्र कागदोपत्री रंगवून महापालिका प्रशासनाने प्रातिनिधिक स्वरूपात गल्लीबोळात सायकली उभ्या केल्या. त्यासाठी खासगी कंपनीला गाठून प्रायोगिक तत्त्वावर फुकटात सायकल मिळविल्या. पण योजनेचा गवगवा करून झाल्यानंतर प्रशासनाने काणाडोळा केला आणि सायकली पुरविलेल्या कंपनीला मनस्ताप झाल्याने योजनेला ‘ब्रेक’ लागला. 

स्मार्टसिटी प्रकल्पात प्राधान्य मिळालेल्या औंध-बाणेर-बालेवाडीसह विद्यापीठ आणि वर्दळीच्या भागातील सुमारे पाचशे सायकलींचा हिशेब महापालिकेला लागत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

एक लाख सायकलींची खरेदी होईल, या आशेने  योजना राबविण्यासाठी पुढाकार घेतलेल्या ‘पीईडीएल’ कंपनीने आता सायकलींमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण सांगत महापालिकेच्या सायकल धोरणापासून चार हात लांब राहाणे पसंत केले आहे. या योजनेतील निम्म्या सायकली  बंद पडल्याची कबुली प्रशासनाने सर्वसाधारण सभेत दिली. या पार्श्‍वभूमीवर सायकल ट्रॅकचा ५० कोटींचा निधी ? सायकल योजनेचे काय झाले, असे प्रश्‍न नगरसेवक नाना भानगिरे यांनी सभेत उपस्थित केले आणि प्रशासनाने दडवून ठेवलेली वस्तुस्थिती उघड झाली. मात्र, नव्याने काही सायकली उपलब्ध झाल्याचे महापालिकेतील कार्यकारी अभियंता नरेंद्र साळुंके यांनी सांगितले. 

सायकली गायब
महापालिका आणि पुणे स्मार्टसिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशनच्या (पीएसडीसीएल) वतीने ही योजना आखली होती. योजनेत त्रुटी असल्याने तिला विरोधही झाला, पण तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी योजना रेटली. त्यानंतर दिमाखात उद्‌घाटने करून टप्प्याटप्प्याने चार हजार सायकली उपलब्ध केल्या. योजनेतील सायकलींना ‘ट्रॅकिंग’ यंत्रणा बसविली असून, त्यामुळे सायकली सुरक्षित रहातील, असा दावा करण्यात आला. योजनेची अंमलबजावणी होऊन दीड-दोन महिने होताच, सायकलींमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यापलीकडे जाऊन काही सायकली गायबही झाल्या. मात्र, तसे झाले नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांत शंभरहून अधिक सायकलींचा हिशेब लागलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर ‘पीईडीएल’ने तांत्रिक कारणे दाखवून योजनेतून माघार घेतली आहे.

शहरात सायकल धोरणाची अंमलबजावणी होत आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या सायकलींमध्ये बिघाड झाल्याने त्या बदलण्यात येणार आहेत. नव्या कंपन्यांच्या सायकली उपलब्ध होतील. नियोजित ट्रॅकचेही काम होईल.
- श्रीनिवास बोनाला, अतिरिक्त नगरअभियंता, महापालिका

Web Title: Municipal Cycle Issue