पुणेकरांचा कौल उद्या कळणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

महापालिकेकडून 14 ठिकाणी मतमोजणी होणार

महापालिकेकडून 14 ठिकाणी मतमोजणी होणार
पुणे - महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर येत्या गुरुवारी (ता. 23) मतमोजणी होणार आहे. त्यासाठी सर्व प्रशासकीय तयारी केल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी सांगितले. शहरातील 41 प्रभागांसाठी विविध भागांत 14 ठिकाणी सकाळी दहा वाजता मतमोजणी होईल. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता पहिला निकाल जाहीर होईल, असेही कुणाल कुमार यांनी सांगितले.

गणेश कला क्रीडा मंच, बाबूराव सणस मैदान, कोरेगाव पार्क येथील अन्नधान्य महामंडळाचे गोदाम, बालेवाडी येथील पुरंदर बहुउद्देशीय केंद्र या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांचे सुमारे 1 हजार 102 उमेदवार असून, त्याकरिता मंगळवारी मतदान झाले. त्यानुसार गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी आवश्‍यक ती यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

कुणाल कुमार म्हणाले, 'ज्या प्रभागांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत, अशा प्रभागांची मतमोजणी पहिल्यांदा घेण्यात येईल. जेणेकरून मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही. काही प्रभागांसाठी 20 तर, काही प्रभागांच्या मतमोजणीसाठी 14 टेबल असतील. प्रभागातील चार गटांतील उमेदवारांची मतमोजणी एकाच वेळी होईल. त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. लोकांच्या माहितीसाठी तो लगेचच जाहीर करण्याची व्यवस्था आहे. सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त राहील.

प्रभाग क्रमांक - मतमोजणीचे ठिकाण
8, 9 - पुरंदर बहुउद्देशीय केंद्र, सकाळनगर
7, 14, 16 - बालेवाडी मैदान
10, 11, 12 - एमआयटी शाळा, कोथरूड
13, 31, 32 - पं. दीनदयाळ उपाध्याय विद्या मंदिर, पौड फाटा
1, 2, 6 - अन्न महामंडळ गोदाम, कोरेगाव पार्क
3, 4, 5 - भिकू राजाराम पठारे प्राथमिक शाळा, खराडी
18, 19, 20 - अबुल कलाम आझाद हॉल, बंडगार्डन
15, 17, 29 - डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल, टिळक रस्ता
30, 33, 34 - एस. पी. कॉलेज, टिळक रस्ता
28, 35, 36 गणेश कला क्रीडा मंच
27, 37, 41 - बाबूराव सणस ग्राउंड
38, 39, 40 - धनकवडी महापालिका सहायक आयुक्त कार्यालय, कात्रज
21, 22, 23 - साधना विद्यालय, हडपसर
24, 25, 26 - सावित्रीबाई शिवरकर बहुउद्देशीय हॉल, वानवडी

Web Title: municipal election result