चला, मतदानाचा हक्क बजावायला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

1608 केंद्रांवरील मतदान यंत्रणा सज्ज; आठ हजारांहून अधिक कर्मचारी नियुक्त

1608 केंद्रांवरील मतदान यंत्रणा सज्ज; आठ हजारांहून अधिक कर्मचारी नियुक्त
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (ता. 21) मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रभाग 6 (क) मध्ये भाजपचे रवी लांडगे यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे. त्यामुळे आता 32 प्रभागांतून 127 जागांसाठी 773 उमेदवार रिंगणात आहेत. उद्या सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत एक हजार 608 मतदान केंद्रांवर मतदान होईल. त्यासाठी आठ हजारांहून अधिक कर्मचारी नियुक्त केले आहेत.

शहरातील पीएमपीएमएल बस आणि खासगी वाहनांमार्फत सोमवारी कंट्रोल, बॅलेट युनिट व इतर मतदान साहित्य पाठविण्यात आले.

केंद्रनिहाय नियुक्त केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांनी हे साहित्य ताब्यात घेतले. मतदान साहित्य बरोबर आहे की नाही, हे तपासण्यासाठी कर्मचाऱ्यांची सकाळपासूनच लगबग सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर मतदान साहित्य घेऊन केंद्राध्यक्ष व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रासाठी रवाना झाले. महापालिका निवडणुकीसाठी इमारतींच्या पार्किंगमध्ये 34, तळमजल्यावर 1471 तर, पहिल्या मजल्यावर 103 मतदान केंद्र आहेत. 75 इमारतींमध्ये पाच व पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र आहेत. मंगळवारी होणारे मतदान आणि गुरुवारी होणारी मतमोजणीची प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी एकूण 8925 कर्मचारी व 1785 पोलिस कर्मचारी नियुक्त केले आहेत.

दृष्टिक्षेपात निवडणूक
* एकूण मतदार : 11 लाख 92 हजार 89
* मतदान केंद्र : 486 इमारतींमध्ये 1608
* संवेदनशील : 88 मतदान केंद्रातील 373 बूथ
* पोलिस बंदोबस्त : 2500 पोलिस कर्मचारी, राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या, होमगार्ड
* सोसायट्यांतील मतदान केंद्र : 40 पेक्षा कमी
* मतदारांच्या मदतीसाठी प्रत्येक मतदान केंद्राजवळ मदतकक्ष
* वैद्यकीय सुविधेसाठी ऍम्ब्युलन्स, आपत्कालीन नियोजनासाठी अग्निशमन यंत्रणा
* पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रासाठी डोली, ज्येष्ठ मतदारांसाठी व्हीलचेअर
* आचारसंहिता कक्ष दूरध्वनी क्रमांक : 020-67331590
* हेल्पलाइन (टोल फ्री) क्रमांक : 18002706111
* व्हॉट्‌सऍप क्रमांक : 7447751372
* "सिटिझन ऑन पॅट्रोल' मोबाईल ऍपद्वारे देखील करता येईल आचारसंहिता भंगाबाबत तक्रार

Web Title: municipal election voting