वृक्ष प्राधिकरणाचे कर्मचारी महिनाभरानंतर "सापडले'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

पुणे - महापालिकेच्या उद्यान खात्यातून वृक्ष प्राधिकरण विभागात वर्ग करण्यात आलेले, परंतु गेले एक महिना गायब झालेले कर्मचारी शुक्रवारी "सापडले'. त्यामुळे महिनाभर ठप्प पडलेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची लगबग दिसून आली. त्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा निःश्‍वास टाकला.

महापालिकेच्या उद्यान विभागाचे विभाजन करण्यात आले आहे. उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण असे दोन विभाग करण्यात आले असून, त्यासाठी उद्यान विभागातील 65 कर्मचारी वृक्ष प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यास एक एक महिना झाला; परंतु उद्यान कार्यालयापासून एक चौक अंतरावर असलेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या कार्यालयात ते रुजू झाले नव्हते. त्यामुळे हे कर्मचारी कुठे गायब झाले, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार विजय काळे यांनी घेतलेल्या बैठकीत हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे महापालिकेतील 65 कर्मचारी गायब झाले असल्याचे वृत्त "सकाळ'ने दिले होते.
दरम्यान, या वृत्तामुळे गायब झालेले हे कर्मचारी अखेर वृक्ष प्राधिकरणाच्या कार्यालयात आज दाखल झाले. त्यामुळे महिनाभरापासून ठप्प पडलेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची लगबग दिसून आली; तसेच रखडलेली कामेदेखील मार्गी लागण्यास सुरवात झाली. मात्र, हे कर्मचारी एक महिना कुठे होते, हा प्रश्‍न मात्र अद्यापही अनुत्तरीतच राहिला आहे.

Web Title: municipal garden department employee