महापालिका मुख्यालय, वायसीएमच्या पाण्याचे ऑडिट करा - सीमा सावळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

पिंपरी - पाणी बचत आणि काटकसर ही काळाची गरज आहे. काटकसरीची आधी महापालिकेने स्वतः पासून सुरवात करावी. त्याकरिता महापालिका मुख्यालय, वायसीएम रुग्णालय आणि शहरातील काही सोसायट्यांचे वॉटर ऑडिट करावे. त्या आधारे पाणी बचतीच्या उपाययोजना स्थायी समितीला सादर कराव्यात, असे आदेश समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी नुकतेच अधिकाऱ्यांना दिले.

पिंपरी-चिंचवडला दररोज होणारा पाणीपुरवठा आणि प्रत्यक्षातील मागणी यात मोठी तफावत असून, ती दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर सावळे यांनी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निगडी सेक्‍टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी वॉटर ऑडिटचे आदेश दिले.

पाणीपुरवठा विभागाचे उपशहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, प्रमोद ओंबासे उपस्थित होते. 

शहराच्या विस्ताराबरोबर पाण्याची मागणीही वाढत आहे. शहरासाठी पवना धरणातून दररोज किती पाणी उचलावे, ते निश्‍चित झाले आहे; परंतु महापालिका दररोज शंभर दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाणी जास्त उचलते. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दंडही भरला जातो. तरीही नागरिकांना कायद्याने ठरलेले दरडोई पाणी देणे शक्‍य होत नाही. त्यामुळे पाण्याचे पर्यायी स्रोत उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत नागरिकांनीच स्वतःहून पाण्याची बचत आणि काटकसरीने वापर करण्याची आवश्‍यकता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

त्यावर सीमा सावळे यांनी नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आधी महापालिकेने स्वतःपासून सुरवात करावी. महापालिका मुख्यालय आणि शासकीय इमारतींना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचा कोणताही हिशेब ठेवला जात नाही. त्यामुळे महापालिका मुख्यालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि शहरातील काही सोसायट्यांचे वॉटर ऑडिट करावे, त्यासाठी काटकसरीचे उपाय सुचवावेत तसेच शहरासाठी चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्पालाही तातडीने गती देण्याचे आदेश त्यांनी दिले.

Web Title: municipal office, ycm water audit