महापालिका @ वन क्‍लिक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

पुणे - सर्वसामान्यांना भेडसावणारे प्रश्‍न सोडविण्यासाठी किंवा हवी असलेली माहिती तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने माहिती तंत्रज्ञानाची कास धरली आहे. मोबाईल ॲप्लिकेशन, डिजिटल लॉकर, मराठी आणि इंग्रजीसह ७८ भाषांत आधुनिक संकेतस्थळ यामुळे महापालिकेची सर्वंकष माहिती आता एका क्‍लिकवर उपलब्ध झाली आहे. त्यात ऑनलाइन तक्रार करता येणार आहे व तिची सद्यःस्थिती कळणार आहे.

 

पुणे - सर्वसामान्यांना भेडसावणारे प्रश्‍न सोडविण्यासाठी किंवा हवी असलेली माहिती तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने माहिती तंत्रज्ञानाची कास धरली आहे. मोबाईल ॲप्लिकेशन, डिजिटल लॉकर, मराठी आणि इंग्रजीसह ७८ भाषांत आधुनिक संकेतस्थळ यामुळे महापालिकेची सर्वंकष माहिती आता एका क्‍लिकवर उपलब्ध झाली आहे. त्यात ऑनलाइन तक्रार करता येणार आहे व तिची सद्यःस्थिती कळणार आहे.

 

महापालिकेच्या सेवा आणि सुविधा नागरिकांना सहजतेने उपलब्ध व्हाव्यात, प्रशासनाला नागरिकांपर्यंत तत्परतेने पोचता यावे यासाठी या सुविधा उपयुक्त ठरणार आहेत. महापालिकेच्या सध्या सुमारे ४० सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्या असून, पुढील टप्प्यात आणखी ४३ सेवा ऑनलाइन होणार असल्याचे महापालिकेचे माहिती तंत्रज्ञान अधिकारी राहुल जगताप यांनी नमूद केले.    
 

पुणे कनेक्‍ट व पीएमसी केअर 
पुणे कनेक्‍ट आणि पीएमसी केअर ही मोबाईल ॲप्लिकेशन्स महापालिकेने नागरिकांसाठी तयार केली आहेत. ‘पुणे कनेक्‍ट’ या ॲपमार्फत महापालिकेच्या विविध करांचा भरणा होऊ शकेल. त्याचप्रमाणे विविध खात्यांबाबतच्या तक्रारींचे निराकरणही त्यावरून होऊ शकते. एखादी तक्रार सोडविण्यासाठीचे टप्पे काय असतील, तिची सद्यःस्थिती आदींबद्दल माहिती मोबाईलवर मिळू शकते. पीएमसी केअर या ॲपमध्ये महापालिकेच्या सर्व खात्यांची माहिती समाविष्ट आहे. तसेच खात्यांच्या कार्यपद्धतीबद्दलच्या माहितीचा त्यात समावेश आहे.  

 

७८ भाषांतील संकेतस्थळ 
महापालिकेचे www.punecorporation.org हे संकेतस्थळ ७८ भाषांत तयार झाले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्‌सॲप आदींद्वारे संकेतस्थळाशी समन्वय साधता येणार आहे. या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर महापालिकेच्या प्रत्येक खात्याची माहिती देणारी मायक्रो वेबसाइटही तयार करण्यात आली आहे. महापालिकेचे सुमारे ४० विभाग असून, त्यातील १६ विभागांच्या मायक्रो वेबसाइट्‌स तयार झाल्या आहेत. 

 

डिजिटल लॉकर 
केंद्र सरकारच्या डिजिटल लॉकर या सुविधेची माहिती महापालिकेच्या माध्यमातूनही नागरिकांना उपलब्ध होणार आहे. या डिजिटल लॉकरच्या संकेतस्थळावर आधार कार्डावरील क्रमांकाद्वारे नागरिकांनी त्यांचे खाते उघडायचे आहे. त्यानंतर नागरिकांनी एखादे प्रमाणपत्र उदा. जन्मतारखेचे प्रमाणपत्र महापालिकेकडे मागितल्यावर आधार कार्डच्या क्रमांकाद्वारे ते प्रमाणपत्र संबंधित नागरिकांच्या डिजिटल लॉकरमध्ये जमा होईल, अशी विविध प्रकारची शासकीय प्रमाणपत्रे संबंधित नागरिकाला त्याच्या आधार कार्डच्या क्रमांकावर ऑनलाइन लॉकरमध्ये उपलब्ध होणार आहेत. 
 

ओपन डेटा पोर्टल 
महापालिकेकडे विस्तृत स्वरूपात शहराची माहिती उपलब्ध असते. या माहितीची आवश्‍यकता नागरिक, अभ्यासगट, शैक्षणिक संस्था, विविध उद्योग समूह, कंपन्या यांना वेळोवेळी हवी असते. उदा, शहराची लोकसंख्या किती, त्यात स्त्री-पुरुषांचे प्रमाण किती, त्यांचा वयोगट, लोकसंख्या वाढीचा वेग तसेच शहरात महापालिकेची रुग्णालये, उद्याने, सांडपाण्याचे प्रकल्प यांची संख्या किती आहे यांचे तपशील. ही माहिती http://opendata.punecorporation.org या संकेतस्थळावर मिळणार आहे. शहराची माहिती देणारे १०० विविध प्रकारचे ‘सेट्‌स’ सध्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ही माहिती वेळोवेळी अद्ययावत करण्याची सुविधाही आहे.

Web Title: Municipal @ One Click

फोटो गॅलरी