महापालिकेच्या मिळकतीही होणार आता चकाचक!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

बाजारपेठा, हातगाडी, फेरीवाल्यांकडील स्वच्छता तपासणाऱ्या महापालिकेने आता महापालिकेच्याच मिळकतींची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांचे आवार आणि अन्य कार्यालये चकाचक ठेवण्याचा आदेशच संबंधितांना दिला आहे. या आदेशाकडे काणाडोळा करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा इशाराही महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

पुणे - बाजारपेठा, हातगाडी, फेरीवाल्यांकडील स्वच्छता तपासणाऱ्या महापालिकेने आता महापालिकेच्याच मिळकतींची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांचे आवार आणि अन्य कार्यालये चकाचक ठेवण्याचा आदेशच संबंधितांना दिला आहे. या आदेशाकडे काणाडोळा करणाऱ्यांना धडा शिकविण्याचा इशाराही महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

शहरात सध्या केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. या स्पर्धेत आपले स्थान वाढविण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न असून, त्यासाठी संपूर्ण शहर आणि उपनगरांतील स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले जात आहे. विशेषत: रस्ते आणि चौकांत खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. रस्त्यावर कचरा पडणार नाही, याची काळजी घेण्याची तंबीच त्यांना दिली आहे. तरीही, त्याकडे दुर्लक्ष करीत हातगाडी आणि स्टॉलधारक रस्त्यावर कचरा आणि शिळे अन्न टाकत असल्याचे दिसून आले आहे. अशा ठिकाणांची पाहणी करून अस्वच्छता करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

स्वच्छतेबाबत बेजबाबदार असल्याचे दिसून आल्याने महात्मा फुले मंडईतील व्यावसायिकांना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दंड केला. त्यानंतर आता महापालिकेच्याच मिळकतींची पाहणी व स्वच्छतेचा आढावा घेण्यात येणार असल्याचे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘अभियानात लोकांचा सहभाग वाढविण्यात येत असून, त्यात महापालिकेच्या सर्व खात्यांना स्वच्छतेकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे. ज्या खात्यात अथवा कार्यालयासंदर्भात तक्रारी आहेत, तेथील प्रमुखांविरोधात तक्रारी केल्या जातील.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Property Cleaning