पालिका शाळांच्या सत्रामध्ये बदल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पिंपरी - खासगी शाळांच्या तुलनेत वर्षागणिक महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती होत आहे. त्यामुळे पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षण विभागाने काही शाळांच्या सत्रात बदल करण्याची शक्कल लढविली आहे. परिणामी, पटसंख्या घटलेल्या शाळा बंद करण्याची नामुष्की टळली. 

पिंपरी - खासगी शाळांच्या तुलनेत वर्षागणिक महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती होत आहे. त्यामुळे पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षण विभागाने काही शाळांच्या सत्रात बदल करण्याची शक्कल लढविली आहे. परिणामी, पटसंख्या घटलेल्या शाळा बंद करण्याची नामुष्की टळली. 

पटसंख्या कमी झाल्यामुळे गेल्या वर्षी १९ शाळांचे एकत्रिकरण करण्यात आले होते. काही शाळांच्या सत्रातदेखील बदल केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर यंदाही काही शाळांनी सत्रात बदल करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला होता. त्यामध्ये चिंचवड गावातील हुतात्मा चापेकर विद्यामंदिर उर्दू शाळा दुपारच्या सत्रात सुरू आहे; परंतु पटसंख्या घटल्याने शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी घेतला. यास पालकांची सहमती आहे. ही शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्यास हरकत नसल्याचा अहवालही पर्यवेक्षकांनी दिला आहे. 

तळवडे येथील किसनराव अंतुजी भालेकर प्राथमिक शाळा क्रमांक ९८ मधील तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची संख्या ४०० पर्यंत वाढली आहे. इतर शाळेच्या तुलनेत पटसंख्या वाढली; पण शाळा एकाच सत्रात भरत आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता शाळा दोन सत्रांत भरविण्याची मागणी मुख्याध्यापक व शिक्षकांनी केली.  शाळेला इमारत आणि वर्गखोल्या कमी पडत आहेत. दोन सत्रांत शाळा भरावावी, असा अहवाल पर्यवेक्षकांनी दिला आहे. तशी परवानगी प्रशासनाने दिली आहे.

ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे आणि त्या दोन सत्रांत भरतात, त्या एकाच सत्रात भरविण्याचा निर्णय घेतला; तसेच ज्या शाळांची पटसंख्या वाढली आहे, त्या शाळांचे सत्र वाढविण्यात येतील.
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका

Web Title: Municipal School