Music
Music

महापालिका विद्यार्थीही गिरवणार संगीताचे धडे

पिंपरी - गणिताचे पाढे, विज्ञानाचे धडे, भाषेचे व्याकरण यांची घोकंपट्टी होणाऱ्या वर्गांमध्ये आता संगीताचे सूरही निनादणार आहेत. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये पहिल्यांदाच गायन आणि वादन या कलांचे धडे गिरविण्याचीही संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात  काही निवडक शाळांमध्येच प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

शाळा म्हणजे अभ्यास हे समीकरण खासगी शाळांमध्ये आता बदलू लागले आहे. क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच कला, क्रीडा व अभिनव प्रयोगातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. मात्र, महापालिका शाळा अशा प्रयोगांपासून अद्याप दूर आहेत. त्यामुळे विद्यार्थीही अशा उपक्रमांपासून वंचित आहेत. त्या पार्श्‍वभूमीवरच विद्यार्थ्यांना संगीत कलेचे प्रशिक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने दिला असून, महापालिकेच्या शिक्षण समितीने तो मंजूर केला आहे. 

आनंददायी शिक्षणासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘गीत मंच’ उपक्रमांतर्गत हा संगीत प्रशिक्षणाचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. पहिल्या सहा महिन्यांकरिता प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

महापालिकेच्या शाळांमधीलच सुरेश मिसाळ, शैलजा गायकर (निवेदक), धर्मेंद्र भांगे (तबला आणि हार्मोनिअम वादन) या तीन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांकडून प्रार्थना, समूहगीत, पोवाडा, कथाकथन स्फूर्तीगीते यासारख्या पारंपरिक गीतांचा सराव करून घेतला जाणार आहे.

शिक्षणातून मुलांना आनंद मिळाला पाहिजे. केवळ नीरस अध्यापनातून विद्यार्थी घडणार नाहीत. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास होणे गरजेचे आहे. या उपक्रमात हार्मोनिअम, तबला, ढोलकी या साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना संगीत वाद्य प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचे कार्यक्रम महापालिका शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने घेतले जातील. या उपक्रमांमुळे शालेय कामकाजात कुठलाच अडथळा येणार नाही.
- प्रा. सोनाली गव्हाणे, सभापती, शिक्षण समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com