चला, मतदान करूया

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

प्रशासकीय यंत्रणा सज्ज; दोन हजार अधिकारी-कर्मचारी

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २१) होणाऱ्या मतदानाकरिता प्रशासकीय यंत्रणा सोमवारी सकाळपासून सज्ज करण्यात आली. मतदानासाठी शहरात सुमारे ३ हजार ४३२ केंद्रे उभारली असून, त्यावर तब्बल १९ हजार ५०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत सर्व केंद्रांवर मतदान होईल. 

प्रशासकीय यंत्रणा सज्ज; दोन हजार अधिकारी-कर्मचारी

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २१) होणाऱ्या मतदानाकरिता प्रशासकीय यंत्रणा सोमवारी सकाळपासून सज्ज करण्यात आली. मतदानासाठी शहरात सुमारे ३ हजार ४३२ केंद्रे उभारली असून, त्यावर तब्बल १९ हजार ५०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत सर्व केंद्रांवर मतदान होईल. 

शहरातील १४५ केंद्रे संवेदनशील
शहरातील ३ हजार ४३२ मतदान केंद्रांपैकी १४५ केंद्रे संवेदनशील असून, त्यात चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८४, डेक्कनमध्ये ८, खडक व फरासखानामध्ये प्रत्येकी ७, हडपसरमध्ये ६ आणि चंदननगर, कोथरूड, सिंहगड रस्त्यावर प्रत्येकी २ संवेदनशील केंद्रांचा समावेश आहे.

मतदान केंद्रनिहाय नेमलेल्या केंद्राध्यक्षांसह मतदान अधिकारी, शिपाई मतदानाचे साहित्य घेऊन सोमवारी सायंकाळी केंद्रांवर हजर झाले.

४१ प्रभागांमधील ९२७ इमारतींमध्ये मतदान केंद्रांची सोय केली असून, त्या ठिकाणी मतदारांसाठी सेवा-सुविधा उभारल्या आहेत. 

ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि अंध व्यक्‍तींसाठी आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सर्व केंद्रांवर पोलिस बंदोबस्त नेमला आहे.  

मतदान आणि मतमोजणीकरिता नेमलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी प्रशिक्षण देण्यात आले असून, केंद्रानुसार मतदार आणि उमेदवारांच्या नावांची यादी त्यांच्याकडे सोपविण्यात आली. 

१०,५०० मतदान यंत्र 
३,५००  नियंत्रण संच
३,४३२  मतदान केंद्र

शहरात २६ लाख ३४ हजार ८०० मतदार असून, त्यात एक लाख ६८ हजार नवीन मतदारांचा समावेश आहे. मतदारांना मतदान केंद्रांची माहिती आणि त्यांच्या नावाचा तपशील असलेल्या मतदानपत्रिका घरपोच देण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून हे काम सुरू आहे.
- सतीश कुलकर्णी, निवडणूक निर्णय अधिकारी

संकेतस्थळांवर माहिती 
महापालिकेच्या संकेतस्थळावर (punecorporation.org) याद्या उपलब्ध आहेत; तसेच votersearch.punecorporation.org आणि pmcvotersearch.org या संकेतस्थळांवर मतदारांना त्यांचा मतदार क्रमांक व केंद्र शोधता येईल. त्याकरिता ऑनलाइन संगणक प्रणालीची सोय केली आहे. मतदाराला त्याचे नाव किंवा विधानसभा मतदार यादीतील भाग क्रमांक व अनुक्रमांक किंवा व्होटर आयडी क्रमांक टाकूनही त्याचे नाव मतदार यादीत शोधता येईल; तसेच मतदार क्रमांक व मतदान केंद्र शोधण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर (१८००१०३०२२२) संपर्क साधता येणार आहे. मंगळवारी (ता. २१) सकाळी सहा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदारांना माहिती देण्यात येईल. महापालिकेच्या ॲपच्या माध्यमातूनही मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधता येईल. 
 

मतदान टक्का वाढण्यासाठी...
मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी विविध संघटना आणि संस्थांच्या माध्यमातून महापालिका प्रयत्नशील आहे. त्याअंतर्गत हॉटेल असोसिएशनने मतदान केलेल्या मतदारांना त्या दिवशी मिष्टान्नाची एक प्लेट मोफत देण्याची घोषणा केली आहे; तर शहरातील पेट्रोल पंप डीलर असोसिएशन आणि ‘क्रेडाई’ संस्थेने स्क्रॅच कार्ड योजनेअंतर्गत एक लिटर पेट्रोल मोफत देण्याची घोषणा केली आहे. मतदान केंद्रातील पहिल्या १०० मतदारांसाठी ही योजना लागू असेल. पीएमपीमधील जाहिरात संस्थेने ३०० बसवर मतदानासाठी मोफत जाहिरात करण्याचे जाहीर केले आहे; तसेच मल्टिप्लेक्‍स असोसिएशननेही मतदान केलेल्या मतदारांना तिकिटाच्या रकमेत १५ टक्के सवलत देण्याचे घोषित केले आहे.

बंदोबस्तासाठी दहा हजार पोलिसांची फौज
महापालिका निवडणुकीत मतदानप्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी शहर पोलिस दल सज्ज झाले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, त्यासाठी दहा हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला आणि सहआयुक्‍त सुनील रामानंद हे स्वत: बंदोबस्ताचा आढावा घेत आहेत. अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त, पोलिस उपायुक्‍त, सहायक आयुक्‍त, पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात राहतील. यासोबतच राज्य राखीव पोलिस दलाच्या पाच तुकड्या, दंगल नियंत्रण पथकाची चार पथके, बाँबशोधक व नाशक पथकाची सहा पथके; तसेच शीघ्र कृती दलाच्या (क्‍यूआरटी) चार पथकांची मदत घेण्यात येणार आहे. सहायक आयुक्‍त आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी स्ट्रायकिंग फोर्स देण्यात आला आहे. संवेदनशील केंद्रांवर एक सहायक निरीक्षक आणि दोन अतिरिक्‍त कर्मचारी दिले आहेत.

Web Title: municipal voting