मलिदा दुसरे खातील, खापर तुमच्यावर फुटेल - योगेश बहल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

पिंपरी - ‘‘महापौर साहेब, तुम्हाला बदलण्याबाबत आम्हाला वृत्तपत्रांमधून वाचायला मिळाले. पण आम्हाला तुम्ही हवे आहात. त्यामुळे वर्गीकरणाचे विषय सर्वसाधारण सभेत थेट दाखल करून घेऊ नका. कारण मलिदा दुसरे खातील आणि खापर तुमच्यावर फुटेल,’’ असा खोचक सल्ला राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश बहल यांनी महापौर नितीन काळजे यांना दिला. 

पिंपरी - ‘‘महापौर साहेब, तुम्हाला बदलण्याबाबत आम्हाला वृत्तपत्रांमधून वाचायला मिळाले. पण आम्हाला तुम्ही हवे आहात. त्यामुळे वर्गीकरणाचे विषय सर्वसाधारण सभेत थेट दाखल करून घेऊ नका. कारण मलिदा दुसरे खातील आणि खापर तुमच्यावर फुटेल,’’ असा खोचक सल्ला राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश बहल यांनी महापौर नितीन काळजे यांना दिला. 

महापालिका सर्वसाधारण सभेचे कामकाज बुधवारी (ता. २०) सुरू होताच, वर्गीकरणाचा विषय दाखल करण्यासाठी मांडण्यात आला. योगेश बहल यांच्यासह विरोधी पक्ष नेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे व मनसेने विरोध केला. सुमारे ३०० कोटींचे वर्गीकरणाचे विषय स्थायी समिती सभेने मंगळवारी दाखल करून सर्वसाधारण सभेत पाठविले आहेत. ते दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. नगरसचिव उल्हास जगताप यांनी प्रशासनाची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार व महापालिका अधिनियमानुसार आयुक्त व स्थायी समितीच्या विनंतीनुसार वर्गीकरणाचा विषय सर्वसाधारण सभेत दाखल करण्यात येत आहे.’’

विरोधक म्हणाले...
योगेश बहल (राष्ट्रवादी काँग्रेस) -
 यापूर्वी वर्गीकरणाचे विषय अशा पद्धतीने कधीच दाखल करून घेतलेले नाहीत. मग अर्थसंकल्प मंजूर करून उपयोग काय? ठेकेदारांना समोर ठेवून हे सर्व उद्योग सुरू आहेत.

दत्ता साने (विरोधी पक्ष नेते) - वर्गीकरणाचा विषय दाखल करून घेण्यास आमचा विरोध आहे. संबंधित विषय रीतसर विषय पत्रिकेवर आणावा. कोणत्या प्रभागातील पैसे वर्गीकरण केले ते सदस्यांना कळायला हवे.

राहुल कलाटे (गटनेते शिवसेना) - वर्गीकरणाचे विषय थेट सभागृहात आणू नयेत. असे विषय दाखल करून घेण्यास आमचा विरोध आहे. 

सत्ताधारी म्हणाले...
सीमा सावळे (माजी अध्यक्षा, स्थायी समिती) -
 सगळीकडे सारखा विकास झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. हा विषय दाखल करून घ्या. तुमच्या प्रभागात कामे होत नसल्यास विरोध करा.

विलास मडिगेरी (स्थायी समिती सदस्य) - वर्गीकरणाच्या विषयात कोणत्याही प्रभागातील रक्कम वर्ग केल्याचा विषय नाही. त्यामुळे हा विषय दाखल करून त्यावर चर्चा करावी. 

एकनाथ पवार (सभागृह नेते) - हे विषय महापालिका अधिनियमानुसार दाखल करून घ्यावेत आणि त्याची प्रत सर्वांना देण्यात यावी. त्या विषयांचा अभ्यास केला जाईल.

Web Title: municipal yogesh bahal talking politics