पालिका निवडणूक प्रभाग पद्धतीनेच हवी - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 March 2020

‘डॉक्‍टरांना अफवाही रोखाव्या लागणार’
कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेने डॉक्‍टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे २० गट केले आहेत. त्यांच्यामार्फत उपाययोजना, जनजागृती सुरू आहे. मात्र, त्यांना अफवा व गैरसमज यांवर नियंत्रण आणण्याचे मोठे काम करावे लागणार आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. महापालिकेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते येथे आले होते. 

आकुर्डीत आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची काळजी घेण्यावर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. नगरसेवकांनी मास्कचे वाटप करावे; पण सर्वांनीच मास्क वापरण्याची आवश्‍यकता नाही. कोरोना हे खूप मोठे संकट आहे. त्याचा सर्वांनी मिळून सामना करूया.’

पिंपरी - ‘महापालिका क्षेत्रातील निवडणूक प्रभाग पद्धतीनेच व्हायला हवी. कारण, कमी लोकसंख्या व क्षेत्राच्या वॉर्डात सर्वसामान्यांना निवडणूक लढविणे अवघड जात असते. निवडणूक लढविण्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे असले तरच सर्वसामान्य माणूसही निवडणूक लढू शकतो,’’ असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.    

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भाजपच्या बैठकीदरम्यान पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, ‘‘सरपंच किंवा नगराध्यक्षाच्या थेट निवडीच्या पद्धतीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बदल केला. हा त्यांनी स्वतःच्या पक्षांच्या फायद्यासाठी घेतलेला निर्णय आहे. कारण, सरपंच किंवा नगराध्यक्ष थेट निवडणूक पद्धतीमुळे सर्वसामान्य माणूससुद्धा निवडून येत होता; परंतु, आता सदस्यांमधून सरपंच किंवा नगराध्यक्ष निवड पद्धतीत सर्वसामान्यांना संधी मिळणे अवघड आहे. या सरकारने गाव व नगर परिषदांमध्ये प्रभागऐवजी वॉर्डपद्धती आणली. महिलांवरील अत्याचाराबाबतचा कायदा करू, असे केवळ आश्‍वासन दिले. पक्ष वाढीसाठीचे कायदे व निर्णय भराभर करून घेतले आहेत.’’ 

Coronavirus : पुणेकरांनो, पुढचे पुढे पाहू, भाजीपाला साठवून ठेवू

आदित्य ठाकरे पर्यटनमंत्री आहेत. त्यामुळे मुंबईत आठ हजार कोटी रुपयांची वरळी डेअरीची जागा प्रेक्षणीय स्थळासाठी दिली आहे. त्यासाठी एक हजार कोटी रुपये दिले आहेत. हे हजार कोटी आणले कुठून आणि त्यांनी घोषणा केलेले प्रकल्प कधीही न होणारे आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

पुणे : परदेशातून आलेल्या तिघांमध्ये लक्षणे

शेतकरी कर्जमाफी फसवी
राज्य सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी आहे. कारण, सरकारच्या निर्णयामुळे केवळ पीक कर्ज माफी होईल. विहीर, पशुपालन, शेतीविकास, पॉलिहाऊस यांसाठी घेतलेले कर्ज सूट होणार नाही. शिवाय, शेतकऱ्यांना हेक्‍टरी रक्कम दिली जाणार आहे, अशी मागणी पाटील यांनी केली. 

धमक्‍यांना घाबरत नाही 
महापालिकेच्या विविध कामांच्या निविदा प्रक्रियांमध्ये गैरव्यवहार झालेला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘गैरव्यवहारांची त्यांनी खुशाल चौकशी करावी. आम्ही धमक्‍यांना घाबरत नाही.’’

CoronaVirus : कोरोनाग्रस्तांवर बहिष्कार टाकल्यास सोसायटीवर कारवाई : जिल्हाधिकारी

येस बॅंकेबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा
रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध आणलेल्या येस बॅंकेत महापालिकेचे ९८४ कोटी २६ लाख रुपये अडकले आहेत. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘अन्य महापालिकांचेही पैसे येस बॅंकेत अडकले असतील. सर्व बॅंकांनी अडकलेल्या पैशांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The municipality needs to be elected by the election ward chandrakant patil