रस्त्यांसाठी पैशांच्या स्वरूपात जागेचा मोबदला देण्यास महापालिकेची तयारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

पिंपळे गुरव ते सांगवी रस्ता
पिंपळे गुरवमधील जवळकरनगर, सुदर्शननगर, वैदुवस्ती; नवी सांगवीतील कवडेनगर, एमके चौक आणि सांगवी गाव यांना जोडणारा रस्ता संरक्षण विभागाच्या हद्दीलगत आहे. हा रस्ता अरुंद आहे. त्यालगत आणखी १८ मीटर रुंद रस्ता करण्याचे नियोजन आहे. यामुळे सांगवी फाटा आणि नाशिक फाटा जोडले जाणार आहेत.

पिंपरी - महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील बहुतांश नियोजित रस्ते संरक्षण विभागाच्या हद्दीत आहेत. त्यांच्याकडून जागा मिळत नसल्याने काही रस्त्यांचे रुंदीकरण व निर्मिती रखडली आहे. या रस्त्यांसाठी जागेचा मोबदला पैशांच्या स्वरूपात देण्यासाठी ‘बोपखेल पॅटर्न’ राबविण्याची महापालिकेची तयारी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या गावांच्या हद्दीलगत लष्कराचा औंध कॅम्प आहे. निगडी, रावेत, प्राधिकरण हद्दीलगत देहूरोड लष्करी हद्द आहे. रुपीनगर, त्रिवेणीनगर, प्राधिकरण सेक्‍टर २२, तळवडेलगत देहूरोड दारूगोळा कारखान्याची हद्द आहे. चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी, दिघीच्या हद्दीलगत लष्कराची फायर रेंज आहे. येथे लष्कराचा नियमित सराव सुरू असतो. बोपखेल, दिघी, भोसरी, कासारवाडी, दापोडी गावांलगत लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाची (सीएमई) हद्द आहे.

पिंपरी गाव, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडी, वल्लभनगरच्या हद्दीलगत डेअरी फार्मची जागा आहे. या आस्थापनांच्या हद्दीतून महापालिकेच्या विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यांचे नियोजन आहे. त्यांच्या विकासासाठी संरक्षण विभागाकडून महापालिकेकडे जागा हस्तांतरित होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

बोपखेलकरांच्या सोयीसाठी लष्कराच्या हद्दीत मुळा नदीवर पूल बांधून खडकीच्या बाजूने रस्ता केला जात आहे. त्या जागेच्या बदल्यात महापालिकेने लष्कराला २५ कोटी रुपये दिले आहेत. याच पद्धतीने शहरातील अन्य रस्त्यांच्या जागांच्या मोबदल्यात लष्कराला रक्कम किंवा जागा देणे शक्‍य आहे. 
- विलास मडिगेरी, सभापती, स्थायी समिती, महापालिका

रस्त्यांची सद्यःस्थिती
पिंपरी मिलिटरी डेअरी फार्म रस्ता
पुणे-मुंबई महामार्गाजवळील आयसीसी व एचए कंपनीच्या मधून पिंपरीत जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर मिलिटरी डेअरी फार्म असल्याने त्याच नावाने रस्ता ओळखला जातो. डेअरी फार्मच्या प्रवेशद्वारासमोरच रेल्वेचे फाटक आहे. शिवाय, रस्ताही अरुंद आहे. त्यामुळे कोंडी होते. यातून मार्ग काढण्यासाठी उड्डाण पूल उभारून रस्ता रुंदीकरणाचे नियोजन पालिकेने केले आहे. 

बोपखेल फाटा-गणेशनगर रस्ता 
पुणे-आळंदी पालखी मार्गावरील बोपखेल फाटा ते बोपखेल गावातील गणेशनगरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस लष्करी आस्थापना आहे. रस्ता अरुंद आहे. या रस्त्याने बोपखेल व कळस या गावांमध्ये जाणे सोईचे आहे. त्यामुळे वर्दळ वाढलेली आहे. भविष्यात मुळा नदीवरील खडकीला जोडणारा पूल झाल्यास आणखी रहदारी वाढेल. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाची गरज आहे.

सांगवी फाटा ते गावठाण रस्ता
औंध-रावेत बीआरटी मार्गावरील सांगवी फाटा ते गावठाण यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूस लष्कराच्या सीक्‍यूएईची सीमा भिंत आहे, तर दुसऱ्या बाजूला औंध जिल्हा रुग्णालय, बा. रा. घोलप महाविद्यालय, पीडब्ल्यूडी कॉलनी आहे. याच रस्त्याने नवी सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडी, दापोडी, नाशिक फाटा येथे जाता येते. हा रस्ता १२ मीटर रुंदीचा प्रस्ताव आहे.

एचसीएमटीआर
भोसरीतील लांडेवाडी ते कासारवाडीतील नाशिक फाटा दरम्यान उच्च क्षमता द्रुतगती मार्ग नियोजित आहे. याचा काही भाग सीएमईच्या हद्दीतून दर्शविला आहे. हाच रस्ता पुढे पिंपळे गुरव व पिंपळे सौदागरच्या हद्दीतून काळेवाडी फाटा येथे औंध- रावेत बीआरटी रस्त्याला मिळतो. त्याच्या उभारणीसाठी सीएमई व पिंपळे सौदागर येथील जागा ताब्यात येणे आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The municipality is preparing to pay for the roads in the form of money