बारामतीत मोकाट जनावरांविरुध्द नगरपालिका राबविणार मोहिम

मिलिंद संगई
Friday, 9 October 2020

मोकाट जनावरांच्या समस्येवर उपाययोजना म्हणून नगरपालिकेने ही जनावरे पकडण्यासाठी कंत्राट दिले आहे. सर्व प्रकारची मोकाट जनावरे पकडण्याचे काम संबंधित कंत्राटदार करणार आहे.

बारामती (पुणे) : मोकाट जनावरांच्या समस्येवर उपाययोजना म्हणून नगरपालिकेने ही जनावरे पकडण्यासाठी कंत्राट दिले आहे. सर्व प्रकारची मोकाट जनावरे पकडण्याचे काम संबंधित कंत्राटदार करणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मोकाट जनावरे पकडण्यासाठी नगरपालिकेने पाच लाखांची तरतूद केली आहे. त्यानुसार संबंधित कंत्राटदाराला हे काम देण्यात आले असून लवकरच मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू होईल. 

पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'!

मोकाट जनावरांच्या समस्येने बारामतीकर गेल्या काही दिवसांत हैराण झाले आहेत. यात सर्वाधिक त्रास भटक्‍या कुत्र्यांचा आहे. त्या सोबतच डुकरे, गाढव, गायी यांचाही उपद्रव शहरात मोठ्या संख्येने आहे. बारामतीच्या गणेश मार्केटमध्ये दोन गायी परस्परांशी भांडताना एक जण जखमी झाल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर फिरला. अनेक ठिकाणी मोकाट जनावरे दुचाकीला आडवी आल्याने अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. मोकाट कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेण्यासह पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना जखमी केल्याच्याही घटना घडल्या आहेत. पहाटे फिरायला बाहेर पडलेल्यांच्या अंगावर ही कुत्री धावून येत असल्याने लोक हैराण होते. 
 

वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सपना झाली साखर कारखान्यात कामगार कल्याण अधिकारी

आरोग्य विभागाचेही पथक 
बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सात कर्मचाऱ्यांचे पथकही यासाठी तयार करण्यात आले असून तेही हे काम करणार असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे यांनी दिली. या संदर्भात नागरिकांना तक्रारी असल्यास सुभाष नारखेडे- 9011685464, राजेंद्र सोनवणे- 9421054333 किंवा अजय लालबिगे 8459417620 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipality will launch a campaign against stray animals in Baramati