esakal | Pune : कारागृहातून जामीनावर बाहेर आलेल्या तरुणाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

pune

कारागृहातून जामीनावर बाहेर आलेल्या तरुणाचा खून

sakal_logo
By
विजय जाधव

भोर : कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस चार जणांनी दगडाने ठेचून ठार केल्याची घटना शनिवारी (ता.2) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. आनंदा गणेश सागऴे (वय. 23, मूळ गाव - नागोबा आळी, भोर. सध्या रा, बालाजीनगर पुणे) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव असून आरोपी सनी सुरेश बारंगळे (रा. सम्राट चौक भोर), अमिर मंहम्मद मणेर, समीर मंहम्मद मणेर (दोघेही रा. नवी आळी भोर) आणि सिद्धांत संजय बोरकर (रा. स्टेट बँके जवळ भोर ता.भोर) हे चौघेजण फरार झाले आहेत. मयत आनंद याची आई वर्षा गणेश सागळे यांनी याबाबत भोर पोलिसांत फिर्याद दाखल केली.

हेही वाचा: मॉडेल कॉलनीतील कचरा प्रकल्पास स्थानिकांचा विरोध

याबाबत भोर पोलिसांनी दिलेली माहिती अशी 18 जानेवारी 2019 रोजी पारवडी (ता.भोर) येथे भोरमधील प्रकाश राजेंद्र पवार याचा खून झाला होता. त्यामध्ये आरोपी असलेला आनंद गणेश सागळे हा कारागृहात होता. गेल्या वर्षापासून तो जामिनावर कारागृहाबाहेर असून तो बालाजीनगर येथे राहण्यास होता. शनिवारी रात्री तो भोरला मित्रांसोबत पार्टीला जाणार असल्याचे त्याने आईला सांगितले होते. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मयत आनंद सागळे हा नागोबा आळीतील आकाश दत्तात्रेय मोरे याच्यासमवेत दुचाकीवरून एसटीस्टँडकडे निघाले होते. त्यावेळी सम्राट चौकात विनापरवानगी सुरु असलेल्या हातगाडीवर सनी बारंगळे, अमिर मणेर, समीर मणेर, आणि सिद्धांत बोरकर हे चौघेजण मद्यपान करीत होते. त्यापैकी समीर मणेर याने आनंद सागळे याच्या गळ्यात हात घालून तू लय मोठा झालाय का असे बोलला. त्यावेळी त्यांच्या धक्याने तिथे उभी असलेली एक दुचाकी खाली पडली.

त्यामुळे त्यांच्यामध्ये बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली. त्यानंतर सनी बारंगळे व सिद्धांत बोरकर यांनी आनंदचे हात पकडले आणि अमिर मणेर, याने दगड व बाटलीच्या साहय्याने आनंदच्या तोंडावर वार करण्यास सुरुवात केली. दरम्यान आकाश मोरे पळून जाऊ लागला. त्यांनी त्याचाही पाठलाग केला परंतु तो मोरे आळीपरिसरात लपून बसल्याने बचावला. आकाशने फोन करून भावाला बोलावून घेतले. त्यावेळी त्यांना आनंदचा खून झाल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, पोलिस उपनिरीक्षक बळीराम सांगळे, पोलिस हवालदार रामचंद्र काटे व उध्दव गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली, आणि आनंद यास रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. दरम्यान भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहाणी केली. परिस्थीतीचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी रविवारी दिवसभर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे पुढील तपास करीत आहेत.

18 जानेवारी 2019 रोजी पारवडी येथे खून झालेला प्रकाश राजेंद्र पवार या गुन्ह्यात आनंद सागळे हा मुख्य आरोपी होता. आणि सनी बारंगळे हा प्रकाश पवारचा जवळचा मित्र होता. त्यामुळे प्रकाशच्या खूनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी आनंद सागळे याचा खून झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी फरारी झालेले आरोपी सनी बारंगळे, अमिर मणेर, समीर मणेर, आणि सिद्धांत बोरकर यांना पकडण्यासाठी पथके तयार केली आहेत. फरार आरोपींचे फोटोही पोलिसांनी जाहीर केले आहेत. आरोपींबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांशी (दूरध्वनी क्रमांक 02113 222533) संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

loading image
go to top