मित्राचे शिर गायब करणारा गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

पुणे - नात्यातील मुलीशी प्रेम करण्यास विरोध केल्याने युवकाचा निर्घृण खून करून त्याचे शिर गायब करणाऱ्या आरोपीस कोंढवा पोलिसांनी तीन दिवसांत जेरबंद केले. दरम्यान, युवकाचे शिर शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पुणे - नात्यातील मुलीशी प्रेम करण्यास विरोध केल्याने युवकाचा निर्घृण खून करून त्याचे शिर गायब करणाऱ्या आरोपीस कोंढवा पोलिसांनी तीन दिवसांत जेरबंद केले. दरम्यान, युवकाचे शिर शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

निजाम असगर हाशमी (वय 18, रा. अण्णा भाऊ साठेनगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे, तर उमेश भीमराव इंगळे (वय 20, रा. अण्णा भाऊ साठेनगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त दीपक साकोरे, वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील व कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी या तपासाबाबत माहिती दिली. 

कोंढव्यातील खडी मशिन चौकाजवळील मैदानात खड्ड्यामध्ये अनोळखी मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे शिर गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी करण्यास सुरवात केली. 

असा घेतला शोध 
मृतदेहाजवळ निळ्या व पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट पोलिसांना आढळून आला होता. त्यावर "एस. के. फलटण' असे इंग्रजी अक्षर होते. त्यावरून पोलिसांनी फलटणमध्ये जाऊन विचारणा केली. फलटणमध्ये शरीरसौष्ठव स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. त्या वेळी तरुणांना टी-शर्ट देण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी संबंधित तरुणाची माहिती मिळविली.

त्याचबरोबर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या हरवलेल्या व्यक्तीच्या तक्रारीची पाहणी केली. हरवलेली व्यक्ती व मृत व्यक्तीमध्ये साम्य आढळल्यानंतर पोलिसांनी उमेशच्या घरच्यांना विचारणा केली. त्यानंतर उमेश सर्वांत शेवटी कोणाबरोबर होता, याची विचारणा केली तेव्हा त्यांना हाशमीचे नाव कळले. त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. न्यायालयाने त्यास 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राजस शेख, सचिन शिंदे, संभाजी नाईक, पृथ्वीराज पालांडे, योगेश कुंभार, राजू कळंबे, गणेश गायकवाड, रिकी भिसे, आदर्श चव्हाण, अजीम शेख, दीपक क्षीरसागर, आनंद धनगर, प्रशांत कांबळे, जगदीश पाटील यांच्या पथकाने तीन दिवसांतच आरोपीला जेरबंद केले. 

ईदच्या दिवशी केला खून 
उमेश व निजाम हे दोघे एकमेकांचे मित्र होते. निजामचे दोन वर्षांपासून उमेशच्या नात्यातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. उमेशचा त्यास विरोध होता. त्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली होती. त्यानंतरही दोघे एकत्र काम करत असे. रमजान ईदच्या संध्याकाळी निजामने उमेशला शिरखुर्मा खाण्याच्या बहाण्याने कोंढवा येथे नेले. तेथेच धारदार हत्याराने त्याचा खून केला. ओळख पटू नये, यासाठी त्याने शिर कापून त्याची विल्हेवाट लावली. दरम्यान, शिर सापडल्याशिवाय उमेशचा मृतदेह स्वीकारण्यास नातेवाइकांनी विरोध दर्शविला होता. त्या वेळी ससून शवविच्छेदन विभागासमोर तणावाचे वातावरण होते.

Web Title: murderer arrested crime