पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

चारित्र्याच्या संशयावरून दोरीने गळा आवळून पत्नीचा खून करणाऱ्या, पण तिने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा बनाव करणाऱ्या दारुड्या पतीस खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

राजगुरुनगर : चारित्र्याच्या संशयावरून दोरीने गळा आवळून पत्नीचा खून करणाऱ्या, पण तिने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा बनाव करणाऱ्या दारुड्या पतीस खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सन 2016 मध्ये घडलेल्या या गुन्ह्याच्या खटल्यावर प्रथमवर्ग न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी हा निकाल दिला. 

उत्तरेश्वर लहू टोणगे (वय 28, सध्या रा. निघोजे, ता. खेड. मूळ रा. चौसाळा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबतची हकिगत अशी की, उत्तरेश्वर टोणगे हा कामानिमित्त चाकण परिसरात आला होता. तो पत्नी वैशाली (वय 25) हिला घेऊन निघोजे येथे राहत होता. वैशालीचा भाऊ बालाजी भास्कर काळे (वय 20) हाही त्यांच्याबरोबर राहत होता. दारूचे व्यसन असलेला उत्तरेश्वर, पत्नीवर सतत संशय घ्यायचा आणि तिला मारहाण करायचा. जिवे मारण्याची धमकीही तिला द्यायचा. वैशालीचा भाऊ बालाजी काळे हा 14 जानेवारी 2016 रोजी कामावर गेला असताना, वैशालीने फाशी घेतली आहे, असा रात्री फोन करून उत्तरेश्वरने त्याला बोलावून घेतले. चाकण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. उत्तरेश्वरचे आधीचे वर्तन लक्षात घेऊन काळे याने 15 जानेवारी रोजी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

या खटल्यात सरकारी वकील अरुण ढमाले यांनी चार साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाच्या वतीने सादर केलेले पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून, न्यायाधीश ब्रम्हे यांनी आरोपीस दोषी ठरवून आजन्म कारावास, पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा शुक्रवारी रोजी सुनावली. 
 

Web Title: A murderer husband get life imprisonment