नदी स्वच्छतेसाठी ‘माय रिव्हर, माय व्हॅलेंटाइन’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पाणी बाटल्या, पिशव्यांचा पोशाख
या कार्यक्रमात नदी प्रदूषणाच्या समस्येची तीव्रता लोकांपर्यंत पोचविण्यासाठी वेगळ्या प्रकारे संदेश देण्यात आला. त्यात प्लॅस्टिक, पाण्याच्या बाटल्या, कचऱ्याच्या काळ्या पिशव्यांचा वापर करून पोशाख करण्यात आला होता.

पुणे - ‘नदी स्वच्छतेवर प्रत्येक पुणेकराला प्रामाणिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. येत्या काळात नदी स्वच्छतेबद्दल संवेदनशीलता निर्माण होईल. त्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने लोकांबरोबर उतरेल. त्यातून नदी नक्की स्वच्छ होईल,’’ असा विश्‍वास महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी व्यक्त केला. ‘‘नदी स्वच्छतेबाबत नागरिकांची प्रशासनाकडूनची अपेक्षा पूर्ण करू,’’ असेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नेहरू युवा केंद्र संघटन आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे ‘माय रिव्हर, माय व्हॅलेंटाइन’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्ताने विविध उपक्रमदेखील घेण्यात आले. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ‘मुकूल माधव फाउंडेशन’च्या ऋतू छाब्रिया, कर्नल लक्ष्मण साठे (निवृत्त), संजय चोरडिया, कल्याण तावरे, अश्‍विनी दरेकर आदी उपस्थित होते. 

पुण्यात राज ठाकरे यांनी घेतली बाबसाहेब पुरंदरे यांची भेट: या मुद्दयांवर झाली चर्चा 

गायकवाड म्हणाले, ‘‘सांगलीतील अग्रणी नदी पुनरुज्जीवित करण्यात यश आले. त्यामुळे त्या नदीने तेथील सुमारे तीस हजार शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. नदी ही आपली आई आहे, असे आपण म्हणतो; पण, तीस-चाळीस लाख लोक ही नदी दिवस-रात्र खराब करतात. हे चित्र बदलण्यासाठी अनेक स्वयंसेवी गट प्रयत्न करत आहेत. त्याला आता प्रशासनाची जोड मिळेल.’’ 

सविताभाभी...तू इथंच थांब! पुण्यातील होर्डिंगची चर्चा

‘पुण्यात एक वर्षाच्या आत शहरात एक किलोही कचरा दिसणार नाही, अशी व्यवस्था उभारण्यात येत आहे. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. याचे यश पैशावर अवलंबून नसून, त्यातील छोट्या-छोट्या माणसांना कसं महत्त्व प्राप्त करून देता येईल, त्यावर अवलंबून आहे,’’ असे त्यांनी स्पष्ट केले. 

डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘मुठा ही अत्यंत प्रदूषित नदी आहे. तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रत्येक पुणेकराची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. कचऱ्याच्या बाबतीत आपल्यामध्ये चेतना जागविणे आवश्‍यक असून, त्याची विल्हेवाट कशी लावावी, याची शास्त्रशुद्ध माहिती असली पाहिजे. यात विद्यार्थी गुंतणे आवश्‍यक आहे.

विद्यापीठाच्या पर्यावरण विभागातर्फे मुळा-मुठा नदीबाबत भरपूर काम केले आहे. त्यावर किमान २५ ‘पीएचडी’चे प्रबंध आहेत. नदीच्या उगमापासून संगमापर्यंत प्रत्येक टप्प्यावर अभ्यास केला आहे. त्यातून जैविक आणि रासायनिक प्रदूषणांचे सविस्तर विश्‍लेषण करण्यात आले आहे.’’ 

श्रीनिवास माटे, सुवर्णा तापकीर, पराग मते आणि राज देशमुख यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My River My Valentine Event for river cleaning in Pune