

भाजपचे पुनरागमन की काँग्रेसची पुनरावृत्ती?
कोहळे-वंजारी लढतीचा मंगळवारी फैसला; ४४५ केंद्रांवरील मतमोजणीकडे लक्ष
ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली आहे, तर विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. भाजपचे सुधाकर कोहळे आणि महाविकास आघाडीचे ॲड. अभिजित वंजारी यांच्यातील लढतीचा निकाल मंगळवारी (ता. २७) जाहीर होणार असल्याने राजकीय वर्तुळातील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघावर दीर्घकाळ भाजपचे वर्चस्व राहिले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मतदारसंघातून चार वेळा विजय मिळविला, तर २०१४ मध्ये भाजपचे प्रा. अनिल सोले विजयी झाले होते. मात्र, २०२० च्या निवडणुकीत भाजपने सोले यांच्याऐवजी संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. या लढतीत ॲड. अभिजित वंजारी यांनी जोशी यांचा पराभव करीत भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसच्या ताब्यात आणला. यंदा भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी देत हा मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. प्रा. अनिल सोले यांनीही कोहळे यांना पाठिंबा दिल्याने भाजपची बाजू बळकट झाल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे, मागील विजय कायम राखण्याचे आव्हान वंजारी यांच्यासमोर आहे. एकूण ३८ उमेदवार रिंगणात असले, तरी मुख्य लढत कोहळे आणि वंजारी यांच्यातच मानली जात आहे. विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांतील ४४५ मतदान केंद्रांवरील मतपेट्या कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतमोजणी केंद्रावर आणण्यात आल्या आहेत. या मतपेट्या सुरक्षित कक्षात ठेवण्यात आल्या असून, तेथे पोलिस बंदोबस्तासह सीसीटीव्हीची नजर आहे. भाजपचे पुनरागमन होते की काँग्रेस आपले वर्चस्व कायम राखते, याकडे सहाही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.
--- चौकट ---
निकालाला उशीर होणार?
मतमोजणीच्या सुरुवातीला अवैध मते वेगळी केली जातील. त्यानंतर वैध मतांच्या आधारे विजयी कोटा निश्चित करून पुढील प्रक्रिया पार पडेल. यासाठी ८४ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी सकाळी सुरू होणार असली, तरी अंतिम निकालासाठी रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.