

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (ता. ८) वयाच्या ७५व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गोव्यातील दोनापावला येथील त्यांच्या निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना पहाटे तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अभिनेते पाटेकर यांच्यावर ‘शासकीय इतमामात’ अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.
पाटेकर यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच रंगभूमी गाजवली. त्याचबरोबर त्यांनी प्रखर सामाजिक जाणीव जपली. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. त्यांनी जलयुक्त शिवार अभियानाला पाठिंबा दिला. त्यासाठी स्वतः शिवारात जाऊन काम केले. ते महाराष्ट्रातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणीही करणार होते. पण त्यापूर्वीच ते अचानक सोडून गेले आहेत.
शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात ः मुख्यमंत्री
शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
‘नटसम्राट’ गमावला : एकनाथ शिंदे
रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणाऱ्या व प्रखर सामाजिक जाणीव जपणाऱ्या नाना पाटेकर यांचे अकल्पित निधन हा फार मोठा धक्का आहे.
मनाला चटका लावणारी बातमी ः सुनेत्रा पवार
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. नाना पाटेकर यांचे दादांशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने झालेली पोकळी माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठीही विशेष दुःखद आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
‘दुष्काळाच्या परिस्थितीत चार-पाच दौरे करणार होते, पण...’
महाराष्ट्राच्या विकासात नाना पाटेकर यांची महत्त्वाची भूमिका राहिली. मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानासाठी तसेच संपूर्ण राज्यात पाणी या विषयावर त्यांनी काम केले. ते या महिन्यात दुष्काळाच्या परिस्थितीत माझ्यासोबत चार-पाच दौरे करणार होते. पण त्यांचे अचानक जाणे हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. त्यांनी विशेषतः शेतकरी आणि शेतमजुरांच्या कल्याणासाठी काम केले. दुष्काळाच्या काळात त्यांची आम्हाला मोठी मदत होणार होती. पण फार मोठे नुकसान झाले आहे, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.