टोल नाक्‍यावर पोलिसांची अशीही ‘गतिमान कारवाई’

नंदकुमार सुतार
सोमवार, 24 एप्रिल 2017

टीप - अशा कारवाया कुठे चालल्याचे दिसले, तर ‘सकाळ’कडे जरूर फोटो पाठवा : त्यासाठी ई-मेल आयडी editor@esakal.com

पुणे - गेल्या शुक्रवारची, सकाळची नऊची वेळ, पुणे-सोलापूर रस्त्यावरील पाटसजवळच्या टोल नाक्‍यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या... अन्‌ दुसऱ्या बाजूला, पोलिसांची एक गाडी आणि काही पोलिस कर्मचारी. टोल भरून गाडी बाहेर पडली रे पडली, की तिला पोलिसांचा हाताचा इशारा ठरलेला. बराच वेळ हे दृश्‍य तेथील सारेच जण बघत होते. नेमके काय चालले होते तिथे?

ती टीम ‘ड्यूटी’ बजावत आहे, ती रहदारी सुरळीत राहावी म्हणून सेवा करते आहे.... अशा काही प्रतिक्रिया. ‘सेवा नव्हे ती, आहे मेवा’ अशीही आणखी एक प्रतिक्रिया. शेवटी नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी काही वेळ थांबायचे ठरवले आणि सुमारे वीस मिनिटे पोलिस पथकाच्या सेवेचे बारकाईने निरीक्षण केले. 

पोलिस पथक केवळ ट्रक अडवत होते आणि तेही परराज्यांचे पासिंग असलेले. पथक होते महामार्ग पोलिसांचे. त्यातील कर्मचाऱ्यांची संख्या पाचेक असेल. तिघांनी टोल नाक्‍याच्या तीन लेन पकडलेल्या, तर दोघे जीपगाडीजवळ उभे. टोल नाक्‍यातून गाडी बाहेर पडली, की हाताच्या इशाऱ्याने गाडी थांबवली जाई. एवढ्या वेळेत वीसेक गाड्या अडवल्याचे दिसून आले. त्यामुळे मागून येणाऱ्या अन्य वाहनांच्या वाहतुकीत काहीसे अडथळे येते होते. मात्र त्याची काही तमा या पथकाला आहे असे वाटले नाही. 

महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालावी यासाठी कायद्याने नेमलेल्या कर्मचाऱ्यांमुळेच वाहतुकीला काही प्रमाणात का असेना अडथळा येत असेल, तर त्यांची भूमिका निश्‍चितच चुकीची आहे असे मानायलाच पाहिजे. त्यामुळे महामार्ग पोलिसांची कर्तव्ये काय आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याला दूरध्वनी करून माहिती घेतली, तसेच महामार्ग पोलिसांची अधिकृत वेबसाइटही चाळली. वेबसाइटच्या मुख्य पानावर प्रमुख मेनूंमध्ये ‘चार्टर ऑफ ड्यूटीज’मध्ये महामार्ग पोलिसांची कामे नमूद केली आहेत. 

वाहतुकीचे नियमन, कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करणे, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे, अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे, अपघाताच्या संभाव्य स्थळांवर थांबणे, वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणे, वाहनांना - प्रवाशांना मार्गदर्शन करणे, दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवण्याकरिता महामार्गालगतचे ढाबे, हॉटेल, पंप यांची तपासणी करणे, अपघाताला कारणीभूत वाहनांचा शोध घेणे, शासनाच्या दोन परिपत्रकांनुसार वाहने - वाहनचालकांवर दावे दाखल करणे इत्यादी इत्यादी. 

टोल नाक्‍याच्या दुसऱ्या बाजूला उभे राहून वाहने अडविण्याची कृती महामार्ग पोलिसांसाठी निहित केलेल्या या कर्तव्यांमध्ये कुठेच बसत नव्हती. तरीही या पोलिसांच्या बाजूने विचार करून पाहू म्हणून आणखी एका अधिकाऱ्याला विचारणा केली असता ‘लेनकटिंग’ करणाऱ्या वाहनांची माहिती मिळाल्यानंतर टोल नाक्‍यांवर थांबून या वाहनांवर कारवाई केली जाते, कारण वाटेत अशी वाहने अडवणे अवघड असते असे एक कारण मिळाले. 

ठीक आहे म्हणून या बाजूने विचार करून पाहिला तरी पोलिसांची कृती त्यात बसत नव्हती. एखाद्या वाहनांवर कारवाई करायची म्हटले, तर खूप ‘गतिमान’ पोलिस असला तरी किमान एक मिनीट तरी लागेल. पण हे पथक काही सेकंदांत ‘कारवाई’ करत होते. कारवाईचा वेग एवढा की ट्रक न थांबवताच केवळ त्याची गती काही क्षण कमी होत असे आणि ‘कारवाई’ होत असे. म्हणजे चालत्या ट्रकवर ‘गतिमान कारवाई’. बसवाहकाला तिकीट फाडायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळ या ‘कारवाई’ला लागत होता. म्हणजे काय या शेवटच्या निकषामध्येही पोलिस पथकाची कृती बसत नव्हती. थोडक्‍यात, तेथे काय चालते हे अधिक ‘सुटं सुटं’ करून सांगण्याची गरज नाही.

महामार्गावर किंवा वेबसाइटवर हेल्पलाइनसह बरीच माहिती पाहायला मिळते. परंतु तेथील पोलिस कर्मचारी सहकार्य करीत नसतील किंवा अशा प्रकारच्या ‘गतिमान कारवाया’ करत असतील, तर कुठे संपर्क साधायचा किंवा त्याची प्रक्रिया काय याची माहिती मात्र कुठेच दिसली नाही. 

Web Title: Nandkumar sutar article on toll naka