पोलिस बंदोबस्तात खुला होणार नांदोशी रस्ता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

- किरकटवाडी- नांदोशी येथील रस्ता जागा मालकाच्या आडमुठी भूमिकेमुळे अडविला आहे.

- येत्या सोमवारी (ता. 26) पोलिस बंदोबस्तात खुला करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

खडकवासला : किरकटवाडी- नांदोशी येथील रस्ता जागा मालकाच्या आडमुठी भूमिकेमुळे अडविला आहे. येत्या सोमवारी (ता. 26) पोलिस बंदोबस्तात खुला करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती. डोंगरी विषयावर चर्चा सुरू असताना आमदार तापकीर यांनी किरकटवाडी ते नांदोशी हा डोंगरी भागात जाणारा रस्ता अडविल्यामुळे येथील नागरिकांची अडचण होत आहे. हा रस्ता सरकारी आहे. या रस्त्यावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या पूर्वी आणि मागील वर्षी निधी टाकलेला आहे, असे त्यांनी सांगितले. तर पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण यांच्या वतीने या रस्त्याला तीन कोटी 57 लाख रुपयांच्या निधीतून किरकटवाडी ते नांदोशी, सणसनगर मुख्य रस्ता डांबरीकरण व मजबूत करण्याच्या कामाचे भूमिपूजन 1 फेब्रुवारी 2019 ला गिरीश बापट यांच्या हस्ते झाले होते. हा मुद्दापण तीपकीर यांनी बैठकीत उपस्थित केला होता.

त्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना बंदोबस्त देऊन या रस्त्यातील अडथळे 26 ऑगस्टला दूर करावेत. आणि रस्ता ताब्यात घावा, अशा सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, रस्त्याचे भूमीपूजन झाल्यानंतर जागा मालकाने तेथे रस्त्यात आंब्याची झाडे लावून लोखंडी तारा लावल्या आहेत. रस्ता अरुंद झाल्यामुळे नांदोशीला जाणारी बस बंद झाली आहे. बस नसल्याने शाळकरी मुलांचे हाल होत आहे. रस्त्याला खड्डे पडले आहेत. तर रस्त्याच्या काँक्रीटिकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. अशी माहिती आमदार तापकीर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandoshi road will be opened under police surveillance