नारायण राणे यांचा भाजप प्रवेश चिंचवडच्या बैठकीत? 

मिलिंद वैद्य 
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

नारायण राणे यांच्यासह त्यांचे पुत्र व अन्य सहकारी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. त्यांचा हा पक्षप्रवेश चिंचवड येथे 26-27 एप्रिलला होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

- पालकमंत्री गिरीश बापट

पिंपरी : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असुन त्यांचा पक्षप्रवेश पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या वेळी होणार की नंतर, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी या शक्‍यतेला दुजोरा दिला. 'अशी शक्‍यता नाही' अशी सावध भूमिका घेत 'नारायण राणे यांचा प्रवेश प्रदेश बैठकीच्या आधी किंवा नंतरही होऊ शकतो' असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 'सकाळ' शी बोलताना स्पष्ट केले. 

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसांची व्यापक बैठक 26 एप्रिलपासून चिंचवड येथे सुरू होत आहे. या बैठकीस पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे काही सदस्य तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे, भाजपचे सरकारमधील मंत्रिगण, खासदार, आमदार आणि प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष असे आठशे ते एक हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्वत: मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे बैठकीच्या निमित्ताने येथे असल्याने राणे यांच्यासह राज्यातील काही बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री बापट म्हणाले की नारायण राणे यांच्यासह त्यांचे पुत्र व अन्य सहकारी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. त्यांचा हा पक्षप्रवेश चिंचवड येथे 26-27 एप्रिलला होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे या विषयावर बोलताना म्हणाले की अनेक ठिकाणी लोक भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत मात्र राणे यांचा प्रवेश पिंपरी-चिंचवडच्या बैठकीत होण्याची शक्‍यता नाही. नारायण राणे या बैठकीच्या वेळी उपस्थित राहू शकतात का, यावर बोलताना ते म्हणाले की प्रवेश झाला तर हजर राहू शकतात. बैठकीनंतर प्रवेश होणार असेल, तर त्यांच्या उपस्थितीचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही.

दरम्यान, राणे यांच्या बरोबरच भोरचे आमदार संग्राम थोपटे हेदेखील भाजपच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.

Web Title: Narayan Rane may join BJP in next few days