पुनाळेकरकडून मोबाईल, लॅपटॉप जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत चार जूनपर्यंत वाढ केली आहे.

पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत चार जूनपर्यंत वाढ केली आहे.  

तपासादरम्यान सीबीआयने पुनावळेकर याच्याकडून एक मोबाईल व दोन लॅपटॉप जप्त केला. ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले असून, त्याचा अहवाल आलेला नाही. त्या अहवालानुसार चौकशी करण्यासाठी दोघांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केली. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी हा आदेश दिला.

कोठडीची मुदत संपल्याने दोघांनाही न्यायालयात हजर केले होते. पुनावळकर याने आरोपींना गुन्ह्यात वापरलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला, हे वकिली नियमांचे उल्लंघन आहे; तर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची असल्याने विक्रम भावे याची सखोल चौकशी करायची आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्यात अनेक आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे पुढील चौकशीसाठी दोघांच्याही कोठडीत १४ दिवसांची वाढ करावी, अशी मागणी ॲड. सूर्यवंशी यांनी केली. 

या गुन्ह्यातील आरोपी शरद कळसकर याने दुसऱ्या गुन्ह्यात दिलेल्या कबुली जबाबावरून पुनाळेकर आणि भावे यांना अटक करण्यात आली आहे. आपल्या अशिलाला सल्ला देणे, हा गुन्हा नाही. असे झाले तर वकिलांना आपले काम करणे अवघड होईल. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निकालांचा संदर्भ देत केलेली अटक कशी चुकीची आहे, हे बचाव पक्षाकडून न्यायालयास सांगण्यात आले. तसेच अटक करण्यासाठी आवश्‍यक असलेले ठोस पुरावे देखील सीबीआयकडे नाहीत. दोघांवरही दाखल करण्यात आलेले गुन्हे जामीनपात्र आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील ॲड. सुभाष झा आणि ॲड. गणेश उपाध्याय यांनी केला. बचाव पक्षाचा युक्तिवाद खोडताना सूर्यवंशी म्हणाले, ‘‘योग्य चौकशी केल्यानंतरच दोघांना अटक करण्यात आली आहे.

गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्यास सांगणे हा कायदेशीर सल्ला नाही. तसेच आरोपीच्या अटकेला आव्हान करायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयात जावे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Dabholkar Murder Case Sanjay Punavalekar Mobile Laptop Crime