उद्योगजकतेच्या दिशेने तरूणाईने टाकले एक पाऊल पुढे

अरुण मलाणी
सोमवार, 29 मे 2017

यिन समर युथ समिट 2017 अंतर्गत सहभागींना मिळाला उद्योजकतेचा मुलमंत्र
 

नाशिक : व्यवसाय, उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्‍यक असणारे गुण.. घ्यावयाची काळजी यासह टाळावयाच्या चुका.. अशा विविध विषयांवर युवक-युवतींना आज मार्गदर्शन लाभले. अंजनेरी येथील सपकाळ नॉलेज हबच्या प्रांगणात स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी प्रस्तुत यंग इस्पिरेटर्स नेटवर्क व सपकाळ नॉलेज हब आयोजित यिन समर युथ समिट 2017 पॉवर्ड बाय नीलय ग्रुप या उपक्रमात आज दुपारपर्यंतच्या सत्रांमध्ये विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. या माध्यमातून सहभागींनी यशस्वी उद्योजकतेचा मुलमंत्र जाणून घेतला. उद्योजकतेच्या दिशेने यानिमित्त तरूणाईने एक पाऊल पुढे टाकले.

काल (ता.28) पासून या उपक्रमाला उत्साहात सुरवात झाली. अतिशय उत्साहवर्धक वातावरणात पार पडलेल्या कालच्या दिवसानंतर आज सकाळी तरूणाईने तितक्‍यात उत्साहात कार्यक्रमस्थळी सकाळी उपस्थिती नोंदविली. दुपारपर्यंत झालेल्या तिनही सत्रात विशेषत: उद्योग, व्यवसायात यशाचे सूत्र मान्यवरांनी विशद केले. इटली येथील अल्बर्टो आयोगे या युवा उद्योजकाच्या भाषणाने उपस्थित तरूणाईला प्रेरणा मिळाली. त्याच्या भाषणावेळी तरूणाई अगदी स्तब्ध होऊन माहिती जाणून घेतली. तसेच सत्र संपल्यानंतर अल्बर्टोसोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

इन्फॉरमेशन सेक्‍युरिटीमध्ये चांगले करीअर : शिकारपूर
रॅन्समवेअर आला आणि जगभरात विविध देशांनी तब्बल सहा बिलीयन डॉलर्सपर्यंत रक्‍कम खर्चुन सायबर सेक्‍युरीटीत वाढ केली. ऍन्टी व्हायरससह अन्य बचावात्मक तंत्रातून अनेकांना रोजगार मिळू शकला. ऑटोमेशनकडे वाटचाल करत असतांना करीअरच्या पर्यायाची योग्य निवड करायला हवी. अतिरेकी कारवायांप्रमाणे भविष्यात सायबरचे धोकेदेखील आहेत. त्यामुळे इन्फॉरमेशन सेक्‍युरीटी या क्षेत्रामध्ये भविष्यात करीअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन उद्योजक दीपक शिकारपूर यांनी आज येथे केले.

ते म्हणाले, की उच्च शिक्षण ही विसाव्या शतकाची बाब झाली आहे. आजच्या एकविसाव्या शतकात पदवीपर्यंतचे शिक्षण पुरे असून या शिक्षणादरम्यान विविध प्रयोगातून करीअरच्या चांगल्या पर्यायाचा शोध घ्यायला हवा. डिजीटल इंडिया, स्कील इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे डिजीटल क्षेत्रातही करीअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. संकेतस्थळ आता कालबाह्य होत चालले असून संपूर्ण जग ऍपमय झाले असल्याचेही लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रशिक्षण घ्यायला हवे असे ते यावेळी म्हणाले. प्रत्येक क्षेत्रात ऑटोमेशन होत असून अनेक कामे आता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होऊ लागली आहेत. त्यामुळे आपण निवडलेल्या करीअरच्या पर्यायाचे भविष्य काय, याचा वेधदेखील घेता आला पाहिजे. असे ते यावेळी म्हणाले.

विद्यार्थीदेखील करू शकतात शेअर, म्युच्युअल फंडात गुंतवणूक
अज्ञानामुळे बहुतांश नागरीकांचा शेअर मार्केट हा नावडीचा विषय असतो. पण शेअर मार्केटविषयी योग्य ती माहिती जाणून घेतल्यास सुरक्षितपणे उत्पन्न मिळविण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थीदेखील अगदी अल्प रक्‍कमेतून शेअर मार्केट, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात, असे प्रतिपादन सीडीएसएलचे इन्व्हेस्टर एज्युकेशन विभागाचे प्रमुख चंद्रशेखर ठाकूर यांनी आज येथे केले. सीडीएसएल प्रस्तुत ऑनलाईन व्यवहार आणि गुंतवणूक या विषयावर ते बोलत होते.

गेल्या काही वर्षांमध्ये विविध कायदे झाले असून सेबीने व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही. ज्याला गुंतवणुकीची जोखीम कमी हवी असेल, अशांसाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यातही मार्केटमधील चढ उतार लक्षात घेऊन एक रक्‍कमी गुंतवणुक करण्याऐवजी मासिक गुंतवणुक करणे फायदेशीर ठरू शकते.
शेअर मार्केटविषयी सखोल माहिती देतांना श्री.ठाकूर म्हणाले, की पूर्वी खरेदी केलेल्या शेअर्ससाठी शेअर सर्टीफीकेट दिले जात होते. परंतु आता ही संकल्पना कालबाह्य झालेली आहे. तसेच आता शेअर्सची खरेदीदेखील काही सेकंदात करता येऊ शकते, असे सांगतांना त्यांनी डिमॅट अकाऊंट उघडण्याच्या प्रक्रियेसह शेअर खरेदी विक्रीची प्रक्रिया लिमिट ऑर्डर, मार्केट ऑर्डर या शेअर खरेदीच्या संकल्पनेसह कॉन्ट्रॅक्‍ट नोट आदी संकल्पना त्यांनी समजावून सांगितल्या. यासाठी त्यांनी पॉपर पॉईंट सादरीकरण केले. शेअरची किंमत कशी मोजली जाते, यासह मार्केटविषयीची रंजक माहिती त्यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने उपस्थित विद्यार्थ्यांना समजून सांगितली.

Web Title: nashik news youth inspiration network YIN