नाशिक रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

चाकण - पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. हा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने आमदार सुरेश गोरे यांनी आज पोलिस अधिकारी, रस्ते कंपनीचे अधिकारी यांच्यासह पाहणी केली. गोरे यांनी रस्ते कंपनीचे अधिकारी, नाणेकरवाडीचे सरपंच व इतरांना सूचना केल्या. महामार्ग आणि सेवा रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चाकण - पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. हा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने आमदार सुरेश गोरे यांनी आज पोलिस अधिकारी, रस्ते कंपनीचे अधिकारी यांच्यासह पाहणी केली. गोरे यांनी रस्ते कंपनीचे अधिकारी, नाणेकरवाडीचे सरपंच व इतरांना सूचना केल्या. महामार्ग आणि सेवा रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या महामार्गावरील अवैध प्रवासी वाहतुकीच्या काही रिक्षांच्या काचा रविवारी रात्री फोडण्यात आल्या. त्यामुळे ही वाहने बंद आहेत. सेवा रस्त्यावर पाणी साचत असून, खड्डेही पडले आहेत. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे.

या रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे. रस्ते कंपनीने याकडे लक्ष द्यावे, तसेच नाणेकरवाडी ग्रामपंचायतीनेही उपाययोजना कराव्यात, यांसह आणखी काही सूचना गोरे यांनी या वेळी दिल्या. आयआरबी रस्ते कंपनीचे अभियंता सतीश इनामदार यांना रस्त्याची कामे करण्याबाबत सांगितले. 

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण मांजरे, पंचायत समितीचे उपसभापती भगवान पोखरकर, शिवसेनेचे खेड तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, नगराध्यक्ष शेखर घोगरे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, नगरसेवक प्रवीण गोरे, धीरज मुटके, लक्ष्मण जाधव, विजय शिंदे, राहुल गोरे, दत्ता गवते, नाणेकरवाडीचे सरपंच सिद्धेश नाणेकर आदी व इतर उपस्थित होते. 

नाणेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गावरील, सेवा रस्त्यावरील कचरा ग्रामपंचायतीने उचलावा, सेवा रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था करावी, असे गोरे यांनी सरपंच नाणेकर यांना सांगितले. याशिवाय त्यांनी चाकणच्या वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, रवींद्र चौधर यांच्याशी वाहतूक नियंत्रणाबाबत चर्चा केली.

कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई - पाटील
‘‘चाकण येथील वाहतूक कोंडीबाबत काहीजण हातात दांडके घेऊन वाहनांच्या काचा फोडत असतील आणि त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्यांमध्ये दहशत व घबराट निर्माण होत असेल; तर तसे करणे चुकीचे आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. लोकप्रतिनिधींनीही शांततेत, कायद्याच्या चौकटीत राहून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पोलिसांचे व अधिकाऱ्यांचे निश्‍चित सहकार्य राहील. चाकणची बदनामी होण्यासारखे काही करू नका,’’ असा इशारा पिंपरी-चिंचवडच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.

आमदार सुरेश गोरे यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. २६) त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अवैध वाहतूक करणाऱ्या पॅगो रिक्षांच्या काचा तळेगाव चौकात फोडल्या होत्या. त्या वेळी काही पोलिसही हजर होते. या पार्श्‍वभूमीवर स्मार्तना पाटील यांनी इशारा दिला. त्या म्हणाल्या, ‘‘अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी आहे का, याची प्रादेशिक परिवहन विभागाकडे खात्री करा. परवाने नसलेल्या वाहनांवर कारवाई करायला प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सांगा. ज्यांचे परवाने नाहीत, ज्या बेकायदा रिक्षा आहेत, त्यांना भंगारात टाका. पण, हे कायद्याला धरून करा. कायदा हातात घेऊन करू नका. कायदा हातात घेतल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. चाकणला ३० जुलै रोजी हिंसाचार झाला.

त्यामुळे चाकणची बदनामी झाली आहे. याचा फटका उद्योगांना बसला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्वांनी योग्य पद्धतीने काम केले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी कायद्याचा आधार घेऊन काम केले पाहिजे. जे चुकीचे काम करतील, त्यांच्यावर कायद्याने कारवाई करावी लागेल. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करत आहेत. पोलिसांची संख्या वाढविण्यात आली आहे. अतिक्रमणे काढणे ही नगर परिषद, महसूल प्रशासन व बांधकाम विभाग यांची जबाबदारी आहे. त्यांनी ती कामे करावीत.’’

वाहतूक कोंडीबाबत गडकरी यांना भेटणार
चाकण औद्योगिक वसाहतीत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. या भागातील रोजगारनिर्मितीसाठी चाकणचा औद्योगिक विस्तार तसेच विकास होणे महत्त्वाचे आहे. चाकणला नाशिक महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे उद्योजक, कामगार, प्रवासी त्रस्त झाले आहेत. नाशिक महामार्गाचे रखडलेले काम लवकर मार्गी लागावे यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना उद्योजकांच्या शिष्टमंडळासह भेटणार आहे अशी माहिती भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजनभाई परदेशी यांनी दिली.

पुणे - नाशिक महामार्ग तसेच चाकण - शिक्रापूर मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत आहे. उद्योगांची वाढ व्हावी, उद्योग टिकावेत, स्थलांतरित होऊ नये यासाठी वाहतूक कोंडी सुटणे गरजेचे आहे, असे परदेशी यांनी सांगितले. दरम्यान, कामगार, उद्योजक, व्यापाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. परदेशी यांनी कामगार तसेच उद्योजकांच्या समस्या समजून घेत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Nashik Road Encroachment Crime