नाशिकफाटा- चाकण आठ ब्लॅक स्पॉट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते चाकण या अठरा किलोमीटरच्या अंतरादरम्यान आठ अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) निर्माण झाले आहेत. त्यामुळे नोकरीसाठी रोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी 
हा रस्ता धोकादायक बनला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली आहे.

पिंपरी - पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते चाकण या अठरा किलोमीटरच्या अंतरादरम्यान आठ अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) निर्माण झाले आहेत. त्यामुळे नोकरीसाठी रोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी 
हा रस्ता धोकादायक बनला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली आहे. 

नाशिक फाट्याकडून चाकण एमआयडीसीकडे जाताना रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या रस्त्यावर कायम छोटे-अपघात घडतात. सद्‌गुरुनगर परिसरात दुभाजकाजवळ वाहने वळण्यासाठी थांबतात. येथे वाहतूक नियंत्रक दिवे यंत्रणा नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूने ये-जा करणारे वाहने भरधाव वेगात असतात. 

या रस्त्यावर मोशी- प्राधिकरणाकडे जाण्यासाठी रस्ता दुभाजकांमध्ये जागा ठेवली नाही. त्यामुळे कचरा डेपो चौकातून येणारी वाहने सर्रास उलट्या दिशेने येतात. वाहतूक पोलिस याकडे दुर्लक्ष करत असल्याने वाहनचालकांचे फावते. 

मोशी भाजी मार्केट चौकातील सिग्नल अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे येथे कोंडी होते. चिंबळी फाटा परिसरात प्रवासी घेण्यासाठी थांबणारे रिक्षाचालक आणि उलट्या दिशेने येणारी वाहने अपघाताला निमंत्रण ठरतात. चाकण एमआयडीसी फाटा परिसरातील सिग्नल अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे येथे सकाळी आणि संध्याकाळी दोन किलोमीटर रांगा लागलेल्या असतात. 

कंटेनरची डोकेदुखी
मोईफाटा परिसरातील रस्ता अरुंद आहे. या परिसरात गोडाऊन असल्यामुळे कंटेनर वळण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हा परिसर ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जातो. महामार्गालगतच्या रस्त्यावर कंटेनर उभे केलेले असतात. त्यामुळे बऱ्याचदा वाहतुकीचा खोळंबा होतो. या रस्त्यावर स्पीडब्रेकर आणि सिग्नल यंत्रणा नाही. कुरुळी चौकात कायम वाहनाच्या रांगा असतात. नियम मोडणाऱ्यांमुळे वाहतूक समस्या गंभीर बनत आहे. 

नाशिक फाटा ते चाकण एमआयडीसीदरम्यानच्या रस्त्याने प्रवास करण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी आणि संध्याकाळी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. नियम तोडणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर अपघात प्रवण क्षेत्रे निर्माण झाली आहेत. वाहतूक पोलिस आणि प्रशासनाने लक्ष घालून ही समस्या सोडविण्याची गरज आहे. या रस्त्यावर आवश्‍यक ठिकाणी सिग्नल आणि स्पीडब्रेकर बसवण्याची गरज आहे, असे जयराम लोणारी यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात...
 नाशिक फाटा ते चाकण एमआयडीसीपर्यंतचे अंतर : १८ किलोमीटर 
 समस्येमुळे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ : दीड ते पावणेदोन तास 
 दिवसाला या रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्या : ४० ते ५० हजार

ब्लॅक स्पॉटची ठिकाणे 
सद्‌गुरुनगर
लांडेवाडी
कचरा डेपो चौक
भाजी मार्केट चौक 
 देहूगाव फाटा
मोई फाटा
कुरुळी चौक
चाकण एमआयडीसी फाटा

नाशिक फाटा ते चाकण एमआयडीसीदरम्यान असणाऱ्या अपघातप्रवण क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर याठिकाणी कोणत्या उपाययोजना करायच्या याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. 
- विनायक ढाकणे, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक

Web Title: Nashikphata Chakan Traffic Black Spot