दौंड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग अडचणींचा

प्रफुल्ल भंडारी
Tuesday, 22 December 2020

दौंड शहरातून जाणाऱ्या नगर-दौंड-कुरकुंभ-बारामती-फलटण राष्ट्रीय महामार्गाची अर्धवट व निकृष्ट कामे आणि सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याने अडचणींचा महामार्ग ठरत आहे. अतिक्रमणे न काढल्याने या अरुंद महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग का म्हणावे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

दौंड - दौंड शहरातून जाणाऱ्या नगर-दौंड-कुरकुंभ-बारामती-फलटण राष्ट्रीय महामार्गाची अर्धवट व निकृष्ट कामे आणि सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याने अडचणींचा महामार्ग ठरत आहे. अतिक्रमणे न काढल्याने या अरुंद महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग का म्हणावे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

दौंड बाह्यवळण रस्त्याचे काम रखडल्याने मनमाड-नगर-दौंड-बारामती-फलटण-बेळगाव हा राष्ट्रीय महामार्ग दौंड शहरातील नागरी वसाहतींच्या मधून जातो. सोनवडी (ता. दौंड) भीमा नदी पूल-नगर मोरी-रेल्वे उड्डाण पूल-गजानन सोसायटी-गोकूळ हॉटेल-राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) ग्रुप पाच व सात दरम्यान मनमानी पद्धतीने, अतिशय संथ गतीने व अतिक्रमणे न काढता काँक्रिटीकरण उरकण्यात आले. महामार्ग १८ मीटर रुंदीचा करण्याचे मंजूर असताना कमाल १४ मीटर व ज्या भागात अतिक्रमण काढण्यात आले नाहीत. तेथे उपलब्ध जागेत काम उरकण्यात आले. अरुंद महामार्गामुळे गजानन सोसायटी-पूना गेट-गोकूळ हॉटेल दरम्यान जाताना एखाद्या गल्लीतून जात असल्यासारखी वाहनचालकांची स्थिती झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महामार्गाचे काम करताना सायकलवरून जाणारे जाणारे विद्यार्थी व दुचाकीस्वारांचा विचार करण्यात आलेला नाही. महामार्गाला लागूनच विद्यालये, बॅंका, मैदाने, कोचिंग क्‍लासेस, निवासी इमारती, एसआरपीएफचे दोन ग्रुप, पेट्रोल पंप, शासकीय कार्यालये, बस थांबे, मंगल कार्यालये, भाजी मंडई, हॉटेल, दुकाने, रिक्षा स्टॅण्ड, असल्याने सदैव वर्दळ असते. वर्दळीचा विचार न करता महामार्गाचे काम उरकल्याने दररोज किरकोळ अपघात घडत आहेत.

#nightcurfew: पुणे शहरात कर्फ्यूचं स्वरुप कसं असणार? महापालिकेनं दिली माहिती

काँक्रिटीकरणामुळे महामार्गाची उंची दीड ते दोन फुटाने वाढल्याने लागून असलेले जोड रस्ते खाली गेले आहेत. सदर जोड रस्ते समतल किंवा वाहतूक योग्य न केल्याने या चढ-उतारांमुळे दररोज किरकोळ अपघात होत आहेत. 

दृष्टिक्षेपात महामार्ग

  • अतिक्रमणे, पदपथांवरील महावितरणचे खांब काढलेले नाहीत
  • एसआरपीएफ ग्रुप सात वसाहतीसमोर महामार्गावरच पाण्याचे डबके
  • नगर मोरी ते गजानन सोसायटी दरम्यान काँक्रिट उखडले आहे
  • बस थांबे, वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल व्यवस्थेचा अभाव
  • पदपथांना लोखंडी जाळ्या बसविल्या नाहीत

महत्त्वाची बातमी : पुणेकरांनो, घाबरून जाऊ नका; संचारबंदीबाबत पोलिस प्रशासनाचे आवाहन

दुभाजकांची उंची वाढवावी
रेल्वे उड्डाण पूल ते एसआरपीएफ पूना गेट दरम्यान महामार्ग दुभाजक बसविलेले नाहीत. महामार्गावरील अवजड वाहतूक, ट्रेलर, कंटेनर, राज्य व परराज्यातील एसटी वाहतूक, दूध, रसायने व इंधनाचे टॅंकर, क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात केली जाणारी उसाची धोकादायक वाहतूक, आदींचा विचार करता दुभाजकांची उंची अधिक असणे आवश्‍यक आहे. 

२४ मीटरचा रस्ता सोयीने कुठे १२, तर कुठे १४ मीटरचा करण्यात आला आहे. नगरपालिकेने अतिक्रमण काढले नाही. वापराच्या आधीच पथदिव्यांच्या खांबांना धडकून अपघात झाले आहेत. रस्त्याचे काम जलद गतीने नियमानुसार व गुणवत्तापूर्ण पाहिजे. सामान्य माणसाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने काम झाले पाहिजे. 
- गणेश काकडे, दुचाकीस्वार नागरिक, दौंड 

रस्त्याचा काही भाग अपुरा असल्याने खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. हायवे उंचावर आणि त्याला जोडणारे रस्ते खाली झाल्याने अडचण झाली आहे. महिला व अपंगांचे फार हाल होत आहेत. 
- श्रीकांत साळवे, जीपचालक, दौंड

मंजूर खर्चाप्रमाणे काम झाले नसल्यास कारवाई झाली पाहिजे. एका मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. शाळा सुरू झाल्यावर वाहतुकीचा प्रश्न फार गंभीर होणार असल्याने वेळीच काळजी घेऊन बदल केले पाहिजेत. 
- ज्योती राऊत, नगरसेविका, दौंड

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National Highway passing through Daund city is difficult