‘महापालिकेच्या सर्व जागा राष्ट्रीय मराठा पक्ष लढविणार’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

पुणे - ‘आमचा पक्ष प्रत्येक मराठी माणूस, शेतकरी, गरीब, कष्टकऱ्यांपासून समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांच्या हक्कांसाठी लढा देणार आहे. याचे पहिले पाऊल म्हणून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व जागा आम्ही लढविणार आहोत,’’ असे राष्ट्रीय मराठा पक्षाचे (रामप) अध्यक्ष अंकुशराव पाटील यांनी सांगितले.

घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सभागृहात ‘रामप’चा स्थापना मेळावा मंगळवारी झाला. पक्षाचे कार्याध्यक्ष विकास पाटील, उपाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, अनिकेत जाधव, प्रकाश जगताप, श्‍याम निंबाळकर, शिवशंकर मोहिते, गीतेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. या वेळी पक्षाची भूमिका मांडतानाच झेंडा, बोधचिन्ह, ध्येय-धोरणांबाबत मार्गदर्शन केले.
अंकुशराव पाटील म्हणाले, ‘‘मराठा क्रांती मोर्चानिमित्त मराठा समाजाचे प्रश्‍न ऐरणीवर आले. याबरोबरच प्रस्थापित राजकीय पक्षांना समाजाची ताकदही समजली. आमचा पक्ष केवळ मराठा समाजच नव्हे, तर सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाणारा आहे. लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष लढेल.’’

विकास पाटील म्हणाले, ‘‘आपल्या राष्ट्रगीतामध्ये ‘मराठा’ हा शब्द जातिवाचक नसून संपूर्ण मराठी नागरिक या उद्देशाने वापरला आहे. तीच व्याख्या आम्ही घेतली आहे.’’

मराठा आरक्षण, तरुणांचे प्रश्‍न, असंतुलित विकास, ग्रामीण भागांकडे होणारे दुर्लक्ष, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीमालास हमीभाव आदी प्रश्‍नांवर ‘रामप’ काम करणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह सर्व निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार उतरतील. अन्य पक्षांतील नाराज व चांगले कार्य करणाऱ्यांना आम्ही संधी देणार आहोत.
- विकास पाटील, कार्याध्यक्ष, रामप

Web Title: national maratha party to contest all municipal seats