मेट्रो, पीएमपीसाठी आता "नॅशनल मोबिलिटी कार्ड' 

मेट्रो, पीएमपीसाठी आता "नॅशनल मोबिलिटी कार्ड' 

पुणे - देशातील कोणत्याही सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी वापरता येईल, अशा "नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड'चा वापर सर्व शहरांनी करायचा आहे, असा आदेश केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे राज्यात महामेट्रोच्या "महाकार्ड' आणि महापालिकेच्या "मी कार्ड'चे भवितव्याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. पार्किंग, टोलसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर येथील मेट्रो प्रकल्पांनाही आता नॅशनल कार्डचा वापर करावा लागणार आहे. 

देशातील कोणत्याही शहरात मेट्रो प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचा वापर करायचा आहे. "वन नेशन वन कार्ड' धोरणानुसार शहर विकास मंत्रालयाने या बाबतच्या सूचना राज्य सरकारला पाठविल्या आहेत. त्यानुसार कोणत्याही शहराने स्वतःचे मोबिलिटी कार्ड काढायचे नाही, असेही बजाविले आहे. केंद्र आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियातर्फे हे कार्ड तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्डचे अहमदाबादमध्ये उद्‌घाटन झाले आहे. तेथील मेट्रोसाठी या कार्डचा वापर सुरू झाला आहे. 

शहरात पीएमपी, महामेट्रोची मेट्रो आणि पीएमआरडीएची मेट्रो यांच्या प्रवासासाठी एकच कार्ड असावे, असा केंद्राचा आग्रह आहे. त्यासाठीच महापालिकेने दोन वर्षांपूर्वी मी कार्डचा वापर सुरू केला आहे. शिक्षण मंडळाच्या योजनांसाठीही ते वापरले जात आहे. महापालिकेचे आणि पीएमपीच्या सर्व कर्मचाऱ्यांनाही त्याचे वाटप झाले आहे. तसेच पीएमपीच्या सुमारे 20 हजार मासिक पासपैकी सुमारे 5 हजार पास मी कार्डमध्ये रुपांतरीत झाले आहेत. नजीकच्या काळात पीएमपीच्या दैनंदिन प्रवाशांना दिले जाणारे दैनिक पासही मी कार्डमध्ये रूपांतरित होणार असून, त्यानंतरच्या टप्प्यात मी कार्डद्वारे प्रवाशांना रोजचा प्रवासही करता येईल. त्यासाठी महापालिका आणि पीएमपीने राष्ट्रीयीकृत बॅंकेशी करार केला आहे. तर महामेट्रोने नागपूरमध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियाबरोबर करार केला आहे. मात्र आता केंद्राच्या नव्या धोरणामुळे या कार्डचा वापर वाहतुकीसाठी करता येईल का, या बाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

मेट्रोसाठी मी कार्ड वापरता येईल, यासाठी पीएमपी प्रशासनाने महामेट्रोला नुकतेच एक सादरीकरण केले आहे. महामेट्रोनेही त्याचा आढावा घेतला आहे. शहरात नजीकच्या काळात पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी होईल. त्यातही मी कार्डचा वापर शक्‍य असल्याचे पीएमपीने स्पष्ट केले होते. या बाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी, मोबिलिटी कार्डबाबत पीएमपी आणि महापालिकेशी चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. तर या बाबत मेट्रोबरोबर बैठका सुरू असून, अद्याप निर्णय झालेला नाही, असे पीएमपीकडून सांगण्यात आले होते. परंतु आता नॅशनल कार्डमुळे त्याचा वापर कसा होणार, या बाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com