नाट्य संमेलन होणार एप्रिलनंतर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

पुणे -  ""निवडणुका, आचारसंहिता यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन एप्रिलनंतर होईल. संमेलनासाठी उस्मानाबाद किंवा नागपूरपैकी एक स्थळ निवडण्यात येणार आहे,'' अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी गुरुवारी जाहीर केली.

पुणे -  ""निवडणुका, आचारसंहिता यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन एप्रिलनंतर होईल. संमेलनासाठी उस्मानाबाद किंवा नागपूरपैकी एक स्थळ निवडण्यात येणार आहे,'' अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी गुरुवारी जाहीर केली.

नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे उद्‌घाटन जोशी यांच्या हस्ते "तिसरी घंटा' वाजवून करण्यात आली. या वेळी ते बोलत होते. परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष प्रवीण बर्वे, समीर हंपी उपस्थित होते.

जोशी म्हणाले, ""बालनाट्यापासून प्रायोगिक नाटक असा प्रवास केला. त्या वेळी अनुभवलेल्या कमतरता या शाखेने दूर कराव्यात. परिषदेने रंगभूमीवर काम केलेल्या 50 ज्येष्ठ कलाकारांसाठी निवृत्तिवेतन सुरू केले आहे. बालनाट्य संमेलने आणि नाट्यस्पर्धा सुरू केल्या. पुढील बालनाट्य संमेलन नांदेड येथे होईल.''

करंजीकर म्हणाले, ""नाट्यक्षेत्रात चांगल्या संहितेची वानवा आहे. त्यामुळे जुन्या नाटकांमध्ये बदल करून ती नव्याने आणावी लागतात. म्हणून चांगली संहिता लिहिणाऱ्या लेखकांनी पुढे यायला हवे.''

प्रायोगिक रंगभूमी पुण्यात स्थलांतरित झाली आहे. या रंगभूमीवरील कलाकारांसह या शाखेने बालनाट्य आणि वेगवेगळ्या स्पर्धांना बळ द्यावे, असेही ते म्हणाले.

नाट्य परिषदेची पुण्यात अजून एक शाखा
""नाट्य परिषदेच्या हडपसर शाखेबाबत निवेदन आले असून, त्याला लवकरच परवानगी मिळणार आहे. तसेच बार्शी, नातेपुते आणि महाबळेश्‍वर शाखेला परवानगी मिळाली असून, त्याचे उद्‌घाटन येत्या जानेवारीत होईल,'' अशी माहिती महाजन यांनी दिली.

Web Title: natya sammelan after april